Uttar Pradesh Election 2022 : प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत कौल कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:55 AM2022-02-24T07:55:54+5:302022-02-24T07:56:19+5:30
Uttar Pradesh Election 2022 : अयोध्येत भाजप-समाजवादी पार्टीत थेट लढत
योगेश बिडवई
अयोध्या : प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत यंदा मतदार कुणाला कौल देणार, याची सर्व देशाला उत्सुकता लागली आहे. अयोध्या जिल्ह्यात ५ जागा असून अयोध्या विधानसभा मतदार संघातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
अयोध्येतून भाजपचे विद्यमान आमदार वेद प्रकाश गुप्ता आणि माजी राज्यमंत्री तेज नारायण उर्फ पवन पांडे आखाड्यात उतरले आहेत. गेल्या वेळी गुप्ता ५० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. मात्र यंदा त्यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून का निवडणूक लढविली नाही, यावरही मतमतांतरे आहेत. ब्राह्मण (टंडन) समाजाचे व बाहुबली म्हणून ओळखले जाणारे उमेदवार पवन पांडे यांनी आव्हान उभे केले आहे.
तर व्यापारी समाजाचे असलेले गुप्ता यांना विकास कामांमुळे दुकाने हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईमुळे व्यापारी वर्ग नाराज आहे. त्याचा त्यांना किती फटका बसतो, यावर त्यांचे भवितव्य ठरेल. भाजपने राम मंदिर निर्माण व अयोध्या नगरीचा आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून सुरू असलेल्या प्रवासाचा मुद्दा पुढे आणला अाहे. तर विकासाच्या नावाखाली भाजपने लूट चालविली असून गुजरातच्या कंत्राटदारांकडे शहर सोपविले जात असल्याचा दावा समाजवादी पार्टीने केला आहे.
जातीची गणिते महत्त्वाची
- अयोध्या विधानसभा मतदार संघात ब्राह्मण, यादव, मुस्लीम, दलित समाजाचे प्रमुख मतदार आहेत. व्यापारी समाजही मोठ्या संख्येने आहे.
- अयोध्या आणि फैजाबाद या दोन शहरांनी मिळून अयोध्या महापालिका तयार झाली आहे. दोन्ही शहरांचे प्रश्न वेगवेगळे आहेत.
व्यापारी भाजपवर का आहेत नाराज?
- अयोध्या विकास प्राधिकरण शहरात विविध विकास कामे करत आहे. त्यात सर्व रस्ते रूंद होणार आहेत.
- त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूची दुकाने हटविली जातील. त्यांना शहरात कुठे जागा मिळेल, या प्रश्नाने व्यापारी हवालदिल झाले आहेत.
- हनुमान गढीमध्ये हाच मुद्दा चर्चेत आहे. त्यातून व्यापारी भाजपवर काहीसे नाराज आहेत.