बोलाची कढी़
By admin | Published: October 9, 2014 04:09 AM2014-10-09T04:09:47+5:302014-10-09T04:09:47+5:30
मोकळ्या मनाचे लोक खूप बोलतात आणि फाजील आत्मविश्वास बळावलेला माणूस वाचाळ असतो. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचं बहुदा असंच काहीसं होऊ घातलंय
बूट
मोकळ्या मनाचे लोक खूप बोलतात आणि फाजील आत्मविश्वास बळावलेला माणूस वाचाळ असतो. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचं बहुदा असंच काहीसं होऊ घातलंय. तसं बघायला गेलं तर एकूणच भाजपावाल्यांच्या डोक्यात त्यांना लोकसभेत मिळालेल्या एकहाती विजयाची हवा गेली आहे. नाकारू नकाच. मर्यादाबंध माणसंच आहात! इतकंच कशाला, तुमचे नरेंद्र मोदीही प्रत्यक्षात या देशाचे पंतप्रधान झाल्यावर, ‘या पी हळद आणि हो गोरी’ला अपवाद राहण्यापासून त्यांना स्वत:ला लांब ठेवू शकत नाहीयेत. असं त्यांच्या या वेळच्या सभांतून नागरिकांना प्रकर्षानं जाणवतंय. तसं लोक बोलून दाखवताहेत. परवा नितीनजी गडकरींना पुण्यात एका नागरिकानं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. कारण ज्यांना सर्वसामान्य लोक मोठा माणूस मोठा माणूस वगैरे समजतात, लोककल्याणकारी शक्तीसारखं काहीतरी मानतात, अशा ज्येष्ठ आणि जाणत्या वाटणाऱ्या नेत्यांकडूनही टोकाचा भ्रमनिरास झाला की लोक रागावतात. व्यक्त होतात. प्रगट होतात. पुण्यातल्या ज्या व्यक्तीने गडकरी यांना बूट दाखवला, तो इसम दारू प्यायला होता असं निष्पन्न झालं. पण म्हणजे तो शुद्धीत राहून जगू शकत नव्हता, असाही एक अर्थ काढता येईलच! आणि तो दारू पिऊन टुण्ण होऊन... पण एका केंद्रीय मंत्र्याच्या राजकीय सभेला आला होता. याचा अर्थ त्याला आवश्यक धाडस भरून दाद मागायला कुठं जायचं याचं भान होतं. नेमकं!
सगळ्यांनी वेळीच विचार केलेला बरा. इट्स अ गेम. कदाचित बुटाने सुरुवात होते. शेवट कसा होईल आणि कोण करेल हे सांगता येत नाही. कित्येक उदाहरणं आहेत. ताजं म्हणाल तर जयललिता. वेळ आली की चिटी के भी पर निकल आते है. सत्तेतील नातेसंबंधांचा प्रभाव वापरून जमीन घोटाळे केले म्हणून रॉबर्ट वढ्रांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी मोदींनी निवडणूक आयोगाला साकडं घातलं आहे. कर्मफळ चुकवता येत नाही. आज नही तो कल पर हिसाबों का है हर पल. मग गांधी असोत का मोदी! याच परिपाठानुरूप आज महाराष्ट्र भाजपावाले त्यांच्या निवडणूक प्रचारसभांतून त्यांच्याचमुळे माजी झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आचारसंहिता लागायच्या आधीच्या काही दिवसांत घाईघाईने हातावेगळ्या केलेल्या काही फाइल्सची आणि याच काळातल्या रात्रीबेरात्री याच मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी धावलेल्या लोकांना, सीसीटीव्ही फुटेजवरून शोधून काढून त्यांचीही कसून चौकशी करण्याची मागणी करत आहेत. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी पंचवीस वर्षं ज्या शिवसेनेशी त्यांनी संसार केला त्या शिवसेनेवरही शिवजयंतीचे निमित्त करून खंडणीखोरीचा आरोप लावला आहे. शिवसेनेलाही त्यांची भाजपाशी असलेली मैत्री तुटल्या-तोडल्यापासून या पक्षाचा दुटप्पीपणा, गद्दारी असं बरंच काही मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा विश्वासघात आणि अखिल हिंदुत्वाची फसवणूक वगैरेंसारखं काही असल्याचं महागांभीर्यानं जाणवू लागलं आहे.
एकुणात काय तर आजवर केवळ निवडणुकांदरम्यान मतसन्मानात असलेला मतदारराजा आताही एकाकीच आहे. हे अटळ वास्तव ज्याच्या ध्यानी येईल, तो भले मदिरेकडून तर मदिरेकडून पण, औटघटिकेच्या धिटाईची उसनवारी करून आणि बूट तर बूट हाती धरून पण समोर येत्या नेत्याची ऐट पिटून काढण्याच्या निश्चयी पोचण्यासाठी धडपडत आहे. जागे व्हा. हा कैफ बरा नव्हे. दीर्घायुषीही नाही. कुणाचा वारसहक्क म्हणूनच दर निमित्ताला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, शाहू महाराज, जोतिबा फुले किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या जयंती-पुण्यतिथीचा ठेका घेणाऱ्यांच्या निव्वळ बोलकढीला जनता भाळेल असं आता तरी दिसत नाही. नेमकं मतदान होणार आहे. अखंड महाराष्ट्र जागा आहे.
- राजेंद्र शिखरे