...अन्यथा पुढचा काळ कठीण आहे; राष्ट्रवादी मंत्री जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:11 PM2022-04-18T17:11:41+5:302022-04-18T17:12:20+5:30

आपण फक्त मिडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

Speak on Inflation otherwise the next period is difficult; NCP Minister Jitendra Awhad warning | ...अन्यथा पुढचा काळ कठीण आहे; राष्ट्रवादी मंत्री जितेंद्र आव्हाडांचा इशारा

...अन्यथा पुढचा काळ कठीण आहे; राष्ट्रवादी मंत्री जितेंद्र आव्हाडांचा इशारा

googlenewsNext

मुंबई - उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या त्यामुळे महागाई आवरती घ्यावी. महागाईवर काहीतरी बोला अन्यथा पुढचा काळ कठीण आहे असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. वाढत जाणाऱ्या महागाई दरावर आव्हाडांनी हे भाष्य केले आहे. गेल्या ७० वर्षात महागाई कधी नव्हे इतकी शिगेला पोहचली आहे असं आव्हाडांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणाले की, मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोहचला आहे याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. ७० वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्‍यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती आता जागतिक बाजारात महागाई नाही पण आपल्या देशात आहे याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली आहे.

तसेच पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा. गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाला विचारा. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय मात्र आपण फक्त मिडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे. एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे असा आरोपही जितेंद्र आव्हाडांनी करत धर्म ही अफूची गोळी आहे ती खाल्ली की लोकं सगळं विसरतात हे कार्ल मार्क्स यांच्या विधानाचा उल्लेखही त्यांनी केला.

महागाई वाढली....

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीत महागाईचा दर १३.११ टक्के इतका होता तर जानेवारीत १२.९६ टक्के महागाई दर होता. मूल्यांकनाच्या आधारे महागाई दर वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होत असतो कारण लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात ही वाढ होऊन वस्तू महाग होतात. डब्ल्यूपीआयचा अर्थ होलसेल प्राइस इंडेक्स आहे. याठिकाणी मालाच्या किंमतीचे दर कळतात. मार्च महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची घाऊक महागाई दर ८.४७ टक्क्यांवरून ८.७१ टक्के इतका झाला आहे. इंधन आणि वीज महागाई दर ३१.५० टक्क्यांवरून ३४.५२ टक्क्यांवर पोहचला आहे.

बटाट्याचे घाऊक दरातही वाढ झाल्याचं दिसून येते. बटाट्याचा दर १४.७८ टक्क्यांवरून २४.६२ टक्के वाढला आहे. कांद्याचे घाऊक दर २६.३७ टक्क्यांवरून जास्त झाला आहे. अंडी, मांसाहार दर ८.१४ टक्क्यांवरून ९.२४ टक्के इतका झाला आहे. गेल्या ४ महिन्यात क्रूड ऑयलचे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर ६.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. १७ महिन्यांतला हा सर्वाधिक दर आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर ६.०७ टक्के इतका होता. खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्याने गृहणींचे आर्थिक बजेट कोलमडलं आहे.

Web Title: Speak on Inflation otherwise the next period is difficult; NCP Minister Jitendra Awhad warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.