बंडखोरांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास विधानसभाध्यक्षांना मंगळवारपर्यंत मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:54 AM2019-07-13T05:54:16+5:302019-07-13T05:54:27+5:30
कर्नाटकमध्ये जैसे थे स्थिती; कुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार
नवी दिल्ली : कर्नाटकातील जनता दल (एस) व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत तसेच त्यांच्या अपात्रतेसंबंधी मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश कर्नाटकचे विधानसभाध्यक्ष रमेशकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला चार दिवस दिलासा मिळाला असला तरी कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून विरोधकांना चकित केले आहे.
बंडखोरांपैकी १० आमदारांच्या व विधानसभा अध्यक्षांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एकत्रित सुनावणी झाली. त्या वेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश दिला. पुढील सुनावणी १६ जुलैला होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. आमदारांनी सादर केलेल्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास विधानसभाध्यक्ष रमेशकुमार जाणूनबुजून उशीर लावत असल्याचे या आमदारांचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. रमेशकुमार यांचे वकील अभिषेक मनु संघवी यांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या राजीनाम्यामागील कारण जाणून घ्यायचे आहे, असे सांगितले. राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेली याचिका बंडखोर आमदारांनी केली असून त्यावर विधानसभा अध्यक्षांना नोटीसही न पाठवता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आदेश दिले, असे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे वकील राजीव धवन यांनी सांगितले. याआधी विधानसभा अध्यक्षांना गुरुवारी एका दिवसात बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. मात्र असा तत्काळ निर्णय घेता येणे शक्य नाही, असे रमेशकुमार यांनी न्यायालयाला कळविले होते. या निर्णयासाठी अधिक वेळ देण्याची मागणी त्यांनी केली होती.
विश्वासदर्शक ठरावाची मागणी
कुमारस्वामी यांची तयारी असल्यास विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात येईल, असे कर्नाटक विधानसभाध्यक्ष रमेशकुमार यांनी म्हटले आहे. विश्वासदर्शक ठराव मांडण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही केली होती.
भाजप आमदारांना हलविणार रिसॉर्टमध्ये
आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूजवळच्या एका रिसॉर्टमध्ये हलविणार आहे, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याचे कुमारस्वामींनी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपने ही दक्षता घेतली आहे.
या रिसॉर्टमधून सोमवारी सकाळी भाजपचे सर्व आमदार थेट विधानसभेत येतील. विश्वासदर्शक ठराव कधी मांडायचा याचा निर्णय कुमारस्वामी सोमवारीच घेण्याची शक्यता आहे.