काेहळा, पॅरोल आणि साधूबाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 09:43 AM2022-02-20T09:43:38+5:302022-02-20T09:44:01+5:30
हिमालयातील एका साधूच्या सांगण्यावरून गेली वीस वर्षे राष्ट्रीय शेअर बाजारासंदर्भात निर्णय घेणाऱ्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या उघडकीस आलेल्या कारनाम्यांनी सारेजण हबकून गेले आहेत; पण हे केवळ एकच उदाहरण नसून, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून काही राजकारणीही साधू, बाबांच्या कच्छपी लागल्याचे दिसून येते.
रवींद्र राऊळ
कुठल्याही साधू, बाबाचे अनुयायीत्व स्वीकारणे ही वैयक्तिक बाब असेपर्यंत त्याला आक्षेप घेतला जात नाही. मात्र, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती साधू अथवा बाबांच्या सल्ल्याने निर्णय घेऊ लागतात तेव्हा त्याचे परिणाम घातक होतात. चित्रा रामकृष्ण यांच्याबाबत हेच घडले. सीईओ पदावर असताना त्यांनी एनएसईतील नियुक्तीपासूनचे सगळे निर्णय साधूच्या सल्ल्याने घेतल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यामागे सीबीआयचे शुक्लकाष्ट लागले आहे. या सगळ्यात तो साधू कोण हे अजूनही समोर आलेले नाही.
समाजकारणापासून राजकारणापर्यंत ठिकठिकाणी गुरू अथवा बाबांचा पगडा दिसून येतो. त्यांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्याही सांगितल्या जातात. गल्लीबाेळात पसरलेल्या साधू, बाबांच्या दरबारात तर सरकार प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती दिसून येतात. मालाड येथील मलंग बाबा तर पोलिसांचा मार्गदर्शक म्हणूनच प्रसिद्ध होता. आरोपीला शोधून काढणे कठीण झाले की काही पोलीस अधिकारी या बाबाचा दरबार गाठीत. तो बाबाही मग हवा असलेला आरोपी अमूक दिवसांनी तमूक दिशेला सापडेल, असे ठणकावून सांगत असे आणि विशेष म्हणजे ते पोलीस अधिकारी त्याच दिशेने आपला तपास सुरू ठेवत. काही वेळा तर कोहळा कापण्यासारखे विधीही तो पोलिसांकडून करून घेई.
हरयाणातील गुरूग्राम डेऱ्याचा प्रमुख गुरमीत राम रहीम बाबाच्या दरबारातही अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांपासून नेत्यांची ऊठबस असे. हत्या आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या राम रहिम बाबाला जन्मठेपेची सजा ठोठावण्यात आली. डेऱ्यातील साध्वीने बलात्काराचा आरोप केल्यावर तिच्यावर दबाव आणण्यासाठी कोणकोणते नेते आपले भक्त आहेत, याची यादीच त्याने सुनावल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे पंजाबमधील निवडणुकीच्या तोंडावर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिम बाबाची पॅरोलवर सुटका करण्यात आली. हा पॅरोलही कोर्टाने नव्हे तर सरकारने दिला आहे. अशा अनेक आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या बाबा, बुवांना अनेक राजकारणी आपले गुरू मानतात आणि उघडपणे त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थितीही लावतात.
वादग्रस्त तांत्रिक तंद्रास्वामी यांचे अनुयायी केवळ देशातील बडे नेतेच नव्हते, तर इतरही अनेक देशांचे प्रमुख त्यांच्या नादी लागले होते. त्यांच्या सल्ल्यानुसार ते राजकारणातील निर्णय घेत. चंद्रास्वामी यांनी दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमचीही भेट घेतली होती.
मुलायमसिंह यादव हे इटावा येथील जय गुरूदेव बाबांचे भक्त होते, तर लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील विभूती नारायण ऊर्फ नारायण पागल बाबाचे शिष्यत्व पत्करले होते. संकटसमयी अथवा यश मिळाले की ते या बाबाकडे जायचे. चारा घोटाळ्यात अडकल्यावर, पडल्यावर आणि तुरुंगात जाण्याआधी ते आशीर्वाद घेण्यासाठी याच पागल बाबाकडे गेले होते. अस्थीर जीवन, ताणतणाव आणि कमालीची स्पर्धा यामुळे महत्त्वाच्या पदांवरील कमकुवत मनाच्या व्यक्ती साधू, बाबांना शरण जातात आणि त्यांच्या सल्ल्याने आपला कारभार हाकू लागतात. पं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या प्रभूतींच्या देशात ही भोंदूगिरी कोणता आदर्श नव्या पिढीपुढे ठेवणार?