पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:17 IST2025-01-31T09:17:17+5:302025-01-31T09:17:57+5:30

कायदेशीररीत्या आणि नैतिक मार्गाने या देशात संपत्ती निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी बड्या उद्योगांनी टाळता कामा नये!

special article Whats wrong with making money | पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

पैसे कमावण्यात गैर काय आहे? - अट फक्त एकच...

एन. आर. नारायण मूर्ती, संस्थापक, इन्फोसिस |

माझा देश अधिक सक्षम करण्यासाठी मी काय करू शकेन, असा विचार करत असताना गरिबी कमी करण्यासाठी उद्योजकतेचा वापर एक चाचणी म्हणून करून पाहायचं मी ठरवलं. ‘इन्फोसिस’च्या प्रयोगातून मला देशातील नागरिकांना आणि उद्योगजगतातील माझ्या सहकाऱ्यांना हे दाखवून द्यायचं होतं की, भांडवलशाही हा रोजगारनिर्मिती आणि गरिबी कमी करण्यासाठीचा  उत्तम पर्याय आहे. भारतात कायद्याच्या आधाराने आणि नैतिक मार्गाने संपत्ती निर्मिती करणं शक्य आहे, भांडवलशाहीमध्ये ती क्षमता आहे, भारतात उच्च कॉर्पोरेट मूल्यांचं पालन करणं शक्य आहे. संपत्तीचं मोठ्या प्रमाणावर लोकशाहीकरणही इथे होऊ शकतं. 

आपल्या समाजातही उद्योगांसाठी मूल्याधिष्ठित सद्भावना (गुडविल) निर्माण करणं शक्य आहे. वाचन, चिंतन आणि समाजवादी, साम्यवादी, भांडवलशाहीचे समर्थक आणि उदारमतवादी व्यक्तींशी केलेल्या चर्चांमधून १९७५ मध्ये मी एका संकल्पनेपर्यंत पोहोचलो. त्या संकल्पनेला मी ‘सहृदयी भांडवलशाही’ असं म्हणतो. कंपॅशनेट कॅपिटॅलिझम! बड्या कंपन्यांच्या अनिर्बंध हावरटपणामुळे मुक्त बाजारपेठ ही फक्त श्रीमंतांनी अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठीच असते, अशी धारणा सर्वसामान्यांमध्ये दृढ झाली आहे. ही धारणा बदलण्याची जबाबदारी उद्योगविश्वाच्या खांद्यावर आहे. ‘सगळं माझ्या एकट्याचं’ ही  धारणा  बदलून संबंधित सर्वांच्या  प्राथमिक गरजा पूर्ण करत करत आपापल्या योगदानावर आधारित तेवढाच मोबदला घेण्याची प्रत्येकाची तयारी असायला हवी. हीच सहृदयी भांडवलशाही! भांडवलशाहीची ताकद तळागाळातल्यांना वर काढण्यासाठी, त्यांच्या फायद्यासाठी वापरली जाणं ही काळाची गरज आहे. सहृदयी भांडवलशाही आणि समाजवादाची सांगड घालणं आवश्यक आहे. 

सहृदयी भांडवलशाही का गरजेची? 
 भारतासारख्या विकसनशील देशात भांडवलशाही हा सर्वांत स्वीकारार्ह पर्याय ठरणं आवश्यक आहे.  नैतिक मार्गाने पारदर्शकपणे आणि सचोटीने संपत्ती निर्मिती करण्याची प्रेरणा उद्योजकांना मिळण्यासाठी त्याची गरज आहे. प्रत्येक लहानसहान गोष्टींकडे मोठी संधी म्हणून पाहणाऱ्या सचोटीच्या स्वप्नाळू तरुणांसाठी हा पर्याय उपलब्ध असला पाहिजे. वैयक्तिक मालमत्तेची शुचिता, कायद्याची अंमलबजावणी, मुक्त व्यापार धोरणाची ताकद आणि कायद्याचं राज्य देणारी आर्थिक व्यवस्था म्हणून भांडवलशाहीवरचा जनतेचा विश्वास दृढ होणं आवश्यक आहे. जॉन एफ केनेडी म्हणाले होते, ‘एखादा समाज बहुसंख्य गरिबांना मदत करू शकत नसेल तर तो मूठभर श्रीमंतांना वाचवू शकत नाही.’ त्यांचं हे विधान लक्षात ठेवणं  आवश्यक आहे. 

ही सहृदयी भांडवलशाही अमलात कशी आणायची? सर्वांत आधी व्यापार उद्योगातील लोकांनी समाजाचा विश्वास परत मिळवण्यात पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी आपलं वर्तन कायद्याला आणि नैतिकतेला धरून हवं. व्यक्तिगत हिताआधी सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यायला हवं. हे करणं उद्योजकांच्या दीर्घकालीन हिताचं असेल. ‘इन्फोसिस’ हे अशा यशाचं नेमकं उदाहरण आहे. पुढच्या पिढ्यांचं जगणं सुसह्य करणं हा या प्रयोगामागचा विचार होता. 

बड्या उद्योगांनी ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’लाही तितकंच महत्त्व द्यायला हवं. ग्राहक, कर्मचारी, गुंतवणूकदार, भागीदार, सरकार असो वा समाज; यातल्या प्रत्येकाला उद्योगांबद्दल आणि या उद्योगांच्या बरोबरीने होणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या शाश्वत विकासाबद्दल खात्री वाटायला हवी.  एखादा समाज अयशस्वी असेल तर त्या समाजात ‘कंपनी’ यशस्वी होऊ शकत नाही, हे उद्योजकांनी लक्षात ठेवायला हवं. कंपनीच्या आर्थिक प्रगतीचा फायदा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या योगदानाच्या प्रमाणात मिळेल, हे कंपनी आणि नेतृत्वाने पाहायला हवं.  हेन्री डेव्हिड थोरोने म्हटल्याप्रमाणे कंपन्यांना विवेक नसतो; पण विवेकी कर्मचारी विवेकी कंपन्या घडवतात. 

कुणाचंही चारित्र्य घडवण्यासाठी नियम करता येत नाहीत. प्रामाणिकपणाची सक्ती करता येत नाही. व्यवसाय-उद्योगांमध्ये चांगल्या वर्तनाचे आदर्श असणं आवश्यक आहे. ते आदर्श घालून देण्याची जबाबदारी आपली आहे. रशियन लेखक अलेक्झांडर सोलझेनित्सिन म्हणतो तसं, ‘चांगल्या-वाईटाच्या मधली पुसट सीमारेषा ही कुठल्याही विशिष्ट राज्यातून किंवा सामाजिक वर्गातून जात नाही, ती प्रत्येक माणसाच्या मनात असते!’ 

(‘आयएमसी  चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ‘ यांच्यावतीने आयोजित   ‘किलाचंद स्मृती व्याख्याना’चा संपादित संक्षिप्त अनुवाद : उत्तरार्ध) 

Web Title: special article Whats wrong with making money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.