वाहन परवाना देताना सरकारने घ्यावी विशेष काळजी- नरेन कार्तिकेयन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:30 AM2018-12-14T01:30:13+5:302018-12-14T01:30:57+5:30
देशाचा पहिला एफवन रेसर याने रस्ते अपघातांविषयी व्यक्त केली चिंता
- रोहित नाईक
मुंबई : ‘भारत जगामध्ये रस्ते अपघातांमध्ये आघाडीवर आहे. मोटरस्पोर्ट रेसिंगच्या तुलनेत रस्ते अपघात अधिक धोकादायक असल्याने हे चित्र बदलणे गरजेचे आहे. त्यासाठीच भारतीय सरकारने वाहन चालक परवाना देताना विशेष काळजी घेत चालक चाचणी अधिक कठोर करावी,’ असा सल्ला भारताचा पहिला फॉर्म्युला वन (एफवन) रेसर नरेन कार्तिकेयन याने ‘लोकमत’शी बोलताना दिला.
गुरुवारी मुंबईत बीकेसी एमएमआरडीए मैदानात आॅटोकार परफॉर्मन्स शोचे उद्घाटन कार्तिकेयनच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्याने ‘लोकमत’सह संवाद साधताना म्हटले की, ‘आज वाहन परवाना मिळविणे खूप सोपे झाले आहे. अनेक तरुण विनाकारण रहदारीच्या रस्त्यांवर वेगाने वाहने पळवितात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारने परवाना देताना कठोर चाचणी प्रक्रिया घ्यायला पाहिजे. वाहने चालविताना मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लघन होते. वाहने वेगवान होत आहेत, रस्ते सुधारत आहेत. आपले राष्ट्रीय महामार्ग जागतिक दर्जाचे होत आहेत, पण ही सुधारणा होत असताना वाहन चालविण्याचे कौशल्य मात्र सुधारत नाही. त्यामुळेच आपल्याला सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवावे लागतील. विविध चाचण्या केल्यानंतरच सरकारने तरुणांना वाहन परवाना दिला पाहिजे. यामुळे अधिक सुरक्षित व जबाबदार चालक निर्माण होतील.’
कार्तिकेयनने पुढे म्हटले की, ‘आपल्याकडे सुरक्षिततेकडे फारसे लक्ष दिले जात नाही, जे खूप गंभीर आहे. कोणतेही वाहन चालविताना सुरक्षितता महत्त्वाची असते. भविष्यात बाइक, कार आणखी वाढतील. त्यामुळेच पुरेपूर सुरक्षितता बाळगून वाहन चालविणेच योग्य राहील. विशेष करून तरुणांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी.’
भारतीय युवा रेसर्सविषयी कार्तिकेयनने म्हटले की, ‘आज एफ वनच्या दिशेने अनेक भारतीय खेळाडू वेगाने आगेकूच करीत आहेत. अर्जुन सैनीसह अनेक खेळाडू चमकत आहेत. या तरुणांमध्ये मोठी गुणवत्ता असून त्यांच्या कामगिरीतही सुधारणा होत आहे. त्यामुळेच पुढच्या वर्षी नक्कीच युरोपियन स्तराच्या फॉर्म्युला थ्रीमध्ये भारतीय चालकांचा सहभाग पाहण्यास मिळेल. अधिकाधिक रेस करून युवा भारतीयांना अनुभव मिळेल आणि त्यातूनच ते प्रगती करतील.’
रेसिंगचे उज्ज्वल भविष्य
भारतात नोएडा येथे रेसिंगसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय येत्या काही वर्षांत भारतात आणखी रेसिंग ट्रॅक निर्माण होतील. त्यामुळे भारतीय रेसिंगचे भविष्य उज्ज्वल आहे. आज भारत क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही चमकत आहे. त्यामुळेच भारताची क्रीडादेश बनण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.
- नरेन कार्तिकेयन