महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा जारी केली विशेष नाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 10:20 AM2024-03-08T10:20:58+5:302024-03-08T10:21:49+5:30
देशात महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा विशेष नाणी जारी करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : आधुनिक जगात महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत. देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोलाची भर घातली आहे. देशात महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा विशेष नाणी जारी करण्यात आली आहेत.
बिकानेरमधील नाणेतज्ज्ञ व नाण्यांचे संग्राहक सुधीर लुणावत यांनी सांगितले की, चलनावर महिलेचे चित्र किंवा छायाचित्र असणे हे सामाजिक समतेचे तसेच महिलांना समान हक्क प्रदान केल्याचे प्रतीक आहे. देशात आतापर्यंत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राणी गाइदिन्ल्यू, बेगम अख्तर, डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी, विजयाराजे सिंधिया, राणी दुर्गावती, संत मीराबाई, श्री माता वैष्णोदेवी आदी सन्माननीय महिलांवर केंद्र सरकारने विशेष नाणी जारी केली आहेत. तसेच भविष्यात राणी लक्ष्मीबाई, करणीमाता, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, साध्वी कनकप्रभाजी, कल्पना चावला, लता मंगेशकर आदी महनीय महिलांच्या सन्मानार्थ विशेष नाणी जारी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.