मणिपूरमधील मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष विमान, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:32 PM2023-05-07T14:32:39+5:302023-05-07T14:43:10+5:30
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलसदृश्य परिस्थिती तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत मदतीचे आश्वासन दिले
बंगळुरू - मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधीच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. हिंसाचारादरम्यान, मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी तिकडे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने यंत्रणा अलर्ट केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला होता. आता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरुन तेथील विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच, लवकरच विशेष विमान पाठवण्यात येईल, असेही सांगितले.
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलसदृश्य परिस्थिती तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत मदतीचे आश्वासन दिले. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी आणि आयआयटीमध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वासन दिले. तसेच, मणिपूरमधील परस्थितीवर महाराष्ट्र सरकार लक्ष ठेऊन आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी देखील मणिपूरच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्य प्रशासनाला दिले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनीही घेतली दखल
मणिपूरमधील हिंसाचारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांने मदतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांनासर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही मणिपूर सरकारशी संपर्क साधला. तसेच या विद्यार्थ्यांना परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना तिथे सुरक्षित वातावरणात राहता येईल.