PM Narendra Modi: काशी विश्वनाथ मंदिरातील कर्मचाऱ्यांना PM मोदींची खास भेट, पाठवल्या जुटच्या चपला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 01:04 PM2022-01-10T13:04:26+5:302022-01-10T13:05:39+5:30
PM Narendra Modi: मंदिर परिसरात संगमरवरावर अनवाणी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येची पंतप्रधानांनी दखल घेतली आणि त्यांच्यासाठी ज्यूटपासून बनवलेल्या चपला पाठवल्या.
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवान भोलेनाथांची नगरी असलेल्या काशीशी एक वेगळीच ओढ आहे. काही दिवसांपूर्वीच पीएम मोदींनी काशीच्या रहिवाशांना विश्वनाथ कॉरिडॉरची मोठी भेट दिली. आता थंडीचा वाढता प्रकोप पाहता पंतप्रधानांनी बाबा विश्वनाथांच्या सेवेत गुंतलेल्या पोलीस, सेवेकरी आणि पुजारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांसाठी खास भेट पाठवली आहे. मंदिर परिसरात संगमरवरावर अनवाणी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येची पंतप्रधानांनी दखल घेतली आणि त्यांच्यासाठी ज्यूटपासून बनवलेल्या चपला पाठवल्या. रविवारी पंतप्रधानांनी पाठवलेल्या चपलांचे वाटप करण्यात आले.
काशी विश्वनाथ धाम मंदिराच्या आवारात चामड्याची किंवा रबराची पादत्राण निषिद्ध आहेत. त्यामुळेच मंदिरातील कर्मचारी आणि इतर सेवेकरींना अनवाणी पायाने काम करावे लागते. या थंडीच्या काळात मंदिराच्या संगमरवर दगडावर अनवाणी काम करणे कठीण आहे. हा त्रास लक्षात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ धाम येथील कामगारांसाठी जूट चपलांच्या 100 जोड्या पाठवल्या आहेत.
100 जोड्यांचे वितरण
विभागीय आयुक्त दीपक अग्रवाल आणि पोलीस आयुक्त ए सतीश गणेश यांच्या वतीने सुमारे 100 जोड्यांच्या जुटांचे वाटप करण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येकाने लाकडी स्टँड घालून कर्तव्य बजावणे योग्य नाही. ही समस्या लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कर्मचाऱ्यांना या जुट चपला पाठवल्या आहेत.
8 तास अनवाणी ड्युटी करणे त्रासदायक
मंदिर परिसरात चामड्याच्या किंवा रबरापासून बनवलेल्या चप्पला वापरण्यावर बंदी आहे. अशा स्थितीत कडाक्याच्या थंडीत 24 तास ड्युटी करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. पीएमओने पाठवलेले ज्यूट पोलीस, सीआरपीएफ, पुजारी, सेवादार, सफाई कामगार यांना देण्यात आले आहेत.