इंग्रजी शाळांनी माध्यम बदलल्यास विशेष अनुदान
By Admin | Published: March 27, 2016 01:16 AM2016-03-27T01:16:24+5:302016-03-27T01:16:24+5:30
राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांनी जर माध्यम बदलून मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारल्यास त्या शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपये याप्रमाणे विशेष अनुदान
पणजी : राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांनी जर माध्यम बदलून मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारल्यास त्या शाळांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपये याप्रमाणे विशेष अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, मातृभाषेतून गोव्यातील मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हावे म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच विविध योजना राबविल्या जात आहेत. मातृभाषेतून म्हणजे मराठी किंवा कोकणीतून जर प्राथमिक शिक्षण झाले तर मुलांना विषय शिकणे सोपे जाते. मातृभाषेतून शिक्षण ही शास्त्रोक्त पद्धत आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने साडेतीन वर्षांपूर्वी विद्यालयांना साधनसुविधा निर्माणासाठी बारा लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्याबाबतचे परिपत्रकही जारी झाले होते; पण त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या.
गेल्या अर्र्थसंकल्पात आपण प्रत्येक विद्यार्थ्यामागे चारशे रुपये देण्याची तरतूद जाहीर केली. जी मुले शासकीय अनुदानित शाळांमध्ये मराठी व कोकणी शाळांमध्ये शिकतात अशा प्रत्येक मुलामागे हे चारशे रुपये शाळेला दिले जातील. शाळा मग या पैशांचा वापर सुविधा वाढविण्यास किंवा अन्य गोष्टींसाठीही करू शकेल. त्यासाठी किचकट सोपस्कार पार पाडण्याची गरज नाही. येत्या शैक्षणिक वर्षी ज्यांना शाळा सुरू करायची आहे, त्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे. या चारशे रुपयांव्यतिरिक्त शिक्षकांसाठी जे वेतनविषयक अनुदान विद्यालयांना दिले जाते, ते सुरूच ठेवले जाईल, असेही पार्सेकर म्हणाले.
सध्या ज्या शाळा इंग्रजी माध्यमातून चालतात, त्यांनादेखील इच्छा असल्यास मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारून चारशे रुपये खास अनुदानाचा लाभ मिळविता येईल. आम्ही २५ कोटी रुपयांची अर्र्थसंकल्पीय तरतूद केली आहे. प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी एक किलोमीटर अंतराची अट असते; पण मराठी-कोकणी शाळा कुणी सुरू करत असेल तर सरकार अंतराच्या अटीवर जास्त लक्ष देणार नाही, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)
सध्या ज्या इंग्रजी माध्यमातील शाळांनी मराठी किंवा कोकणी माध्यम स्वीकारून चारशे रुपये खास अनुदानाचा लाभ मिळविता येईल.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास दीड महिन्याचा कालावधी बाकी आहे. या चारशे रुपयांव्यतिरिक्त शिक्षकांसाठी जे वेतनविषयक अनुदान विद्यालयांना दिले जाते, ते सुरूच ठेवले जाईल