दिल्लीत महाराष्ट्र सदनात दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 01:46 AM2019-08-10T01:46:35+5:302019-08-10T01:46:51+5:30
सरकार दखल घेत नसल्याचा बच्चू कडूंचा आरोप
नवी दिल्ली : दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले असून, एक हजार अपंगांसह त्यांनी येथील महाराष्ट्र सदनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत सदन सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारकडे अपंगांसाठी १६ टक्के निधी शिल्लक असतानाही दिव्यांगांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. इतर राज्यांमध्ये अपंगांना तीन हजार रुपये पेन्शन असताना महाराष्ट्रात केवळ ६०० रुपये दिले जाते. दिव्यांगासाठीच्या जागा रिक्त असतानाही भरती केली जात नाही. रोजगार देण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्तरावर आंदोलन
प्रहार संघटनेद्वारे आम्ही दिव्यांगांचे दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. पेन्शन व रोजगार या प्रमुख मागण्या आहेत. शिक्षकांप्रमाणे दिव्यांगासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा, असे सांगून संघटनेचे मयूर काकडे म्हणाले की, केंद्राकडून अपंगांसाठी आणलेली ‘सुगम्य भारत’ योजनाही अपयशी ठरली आहे.