GST लागू करताना संसदेत 30 जूनच्या मध्यरात्री विशेष कार्यक्रम
By admin | Published: June 20, 2017 02:38 PM2017-06-20T14:38:16+5:302017-06-20T14:38:16+5:30
स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असलेल्या जीएसटीची येत्या 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - स्वातंत्र्यानंतरची देशातील सर्वात मोठी कर सुधारणा असलेल्या जीएसटीची येत्या 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यासाठी 30 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम होणार आहे. संसदेचे सर्व खासदार, जीएसटी परिषदेचे सदस्य, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी वर्गाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याची माहिती जेटलींनी दिली.
30 जूनच्या मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपरराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनही या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एचडी देवेगौडा यावेळी मंचावर उपस्थित असतील. तासाभराच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मार्गदर्शन करतील. जीएसटी संदर्भात दोन लघुपट यावेळी दाखवण्यात येतील.
बिग बी जीएसटीचे नवे ब्रँड अॅम्बेसिडर
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कराच्या प्रमोशनसाठी अर्थ मंत्रालयाने अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे त्याआधी लोकांपर्यंत जीएसटी नेमकं काय आहे, त्याचे फायदे काय या सगळ्या गोष्टी पोहचविण्यासाठी बिग बींची निवड करण्यात आली आहे. यासाठी खास तयार केलेला ४० सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शनही या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
40 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन जीएसटीचं महत्त्व सांगत आहेत तसंच जीएसटीचं महत्त्व सांगताना ते भारताच्या तिरंग्याचा दाखला देत आहेत. भारताच्या झेंड्यावर असणारे तीन रंग हे आपल्याला एकत्र बांधून ठेवतात त्याचप्रमाणे, जीएसटीमुळेही एक राष्ट्र, एक कर आणि एक बाजारपेठ होणार असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलं आहे. येत्या १ जुलैपासून जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करांच्या जागी फक्त जीएसटी हा एकच कर लागू होईल. याआधी जीएसटीसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड होण्यापूर्वी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची निवड करण्यात आली होती