डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त टिप्पणी हार्दिक पांड्याला भोवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 08:56 AM2018-03-22T08:56:43+5:302018-03-22T08:56:43+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एक वादग्रस्त विधान हार्दिक पांड्याला महागात पडणार आहे.
राजस्थान- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एक वादग्रस्त विधान हार्दिक पांड्याला महागात पडणार आहे. जोधपूरच्या एका अनुसूचित जाती-जमातीच्या न्यायालयानं हार्दिक पांड्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पांड्याविरोधात न्यायालयात एकानं याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पांड्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याचिकाकर्ते डी. आर. मेघवाल यांच्या मते, 26 डिसेंबर 2017ला हार्दिक पांड्यानं स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. ज्यात त्यानं डॉ. आंबेडकरांचा अपमान केला होता. त्याच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेक दलित बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. हार्दिक पांड्यानं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोण आंबेडकर ?, ज्यांनी देशाच्या संविधानाचा मसुदा तयार केला आणि देशाला आरक्षण नावाचा आजार दिला. पांड्याच्या याच विधानावर आक्षेप घेत मेघवाल यांनी याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रीय भीम सेनेचे सदस्य असलेल्या मेघवाल यांनी याचिकेत पांड्यानं बाबासाहेबांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. एखाद्या क्रिकेटपटूनं अशा प्रकारची टिप्पणी करणे हा तर संविधानाचा अपमान आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी दलित बांधवांच्या भावनाही दुखावल्या आहेत, असंही मेघवाल यांनी याचिकेत नमूद केलं आहे. हार्दिक पांड्याच्या या ट्विटबाबत मला जानेवारीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली. हार्दिक पांड्याची ही टिप्पणी म्हणजे दलित बांधवांच्या भावना भडकावण्याचाच एक प्रकार असल्याचंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.