संसदेची सुरक्षा विशेष कमांडो प्रशिक्षित पथकाकडे
By admin | Published: July 4, 2014 05:41 AM2014-07-04T05:41:35+5:302014-07-04T05:41:35+5:30
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच खास संसदेसाठी उभारलेल्या विशेष कमांडो प्रशिक्षित पथकाने संसद भवन परिसराच्या संरक्षणाची धुरा स्वीकारली आहे
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच खास संसदेसाठी उभारलेल्या विशेष कमांडो प्रशिक्षित पथकाने संसद भवन परिसराच्या संरक्षणाची धुरा स्वीकारली आहे. हे पथक देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने तयार केले आहे. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या पथकाची उभारणी करण्याचे योजण्यात आले होते. या पथकातील कमांडो व सुरक्षा जवान हे पार्लमेंट ड्युटी ग्रुप (पीडीजी) या नावाने ओळखले जातील.
गेल्या काही काळापासून संसद भवनाच्या परिसरात या पथकाला तैनात करण्यात आले असून, त्यांनी येथील संपूर्ण व्यवस्था आपल्या हाती घेतली आहे. या पथकातील कमांडो व जवान २४ तास संसद भवन परिसरात निगराणी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय सत्र ७ जुलैपासून सुरू होत आहे.
या पथकाकडे संपूर्ण संसद भवनाच्या संरक्षणाची जबाबदारी राहणार असून त्यात मुख्य संसद भवन, स्वागत कार्यालय, संसदीय ज्ञानपीठ व संसद भवनाची जोड इमारत यांचा समावेश राहील. हे पथक दिल्ली पोलीस, संसद सुरक्षा पथक व एनएसजी कमांडोसोबतच्या समन्वयाने संसद भवन परिसरात येणारे अतिविशिष्ट व्यक्ती, खासदार व भेटीस येणाऱ्या अन्य पाहुण्यांची सुरक्षितता व्यवस्था सांभाळणार आहे.
या पथकात १५०० जवान असतील. हे जवान केवळ कमांडो प्रशिक्षण वा युद्धनीतीतच प्रवीण नसतील तर आपत्ती व्यवस्थापनातही त्यांचा हातखंडा असेल.
हे पथक संसद भवनाच्या अतिरिक्त सचिवांच्या अंतर्गत काम करेल व त्याचा अंतिम अधिकार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक यांच्याकडे राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)