कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीने बनविला विशेष तंबू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 05:15 AM2020-04-13T05:15:52+5:302020-04-13T06:00:52+5:30
सुमारे ९.५५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा हा विशेष तंबू वॉटरप्रूफ फॅब्रिक, स्टील, अॅल्युमिनियम अशा गोष्टींचा वापर करून बनविण्यात आला आहे. अगदी
नवी दिल्ली : कोरोना बाधितांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यास उपयुक्त व २ खाटा बसतील, असा विशेष तंबू आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने तयार केला आहे.
अशा प्रकारचे ५० विशेष तंबू तयार करून ते अरुणाचल प्रदेशला नुकतेच पाठविण्यात आले. आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाच्या कानपूर येथील आॅर्डिनन्स इक्विपमेंट फॅक्टरीतील तज्ज्ञांनी हे तंबू तयार केले आहेत. हे तंबू स्वस्त किमतीचे असून कोरोना रुग्णांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यासाठी त्यांचा अतिशय चांगला उपयोग होत आहे.
सुमारे ९.५५ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाचा हा विशेष तंबू वॉटरप्रूफ फॅब्रिक, स्टील, अॅल्युमिनियम अशा गोष्टींचा वापर करून बनविण्यात आला आहे. अगदी थोडक्या वेळात हा तंबू कुठेही उभारता येऊन कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार सुरू करता येतात. नागपूर येथील अंबाझरी भागातल्या आॅर्डिनन्स फॅक्टरीने स्वच्छताकार्यासाठी फ्युमिगेशन चेंबर बनविले आहे. ते रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी बसविता येते.
हात धुण्याच्या यंत्राची निर्मिती
डेहराडून येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीने कोरोना साथीला रोखण्यासाठी पेडलच्या साहायाने संचालित होणारे हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. आॅप्टो इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याने हँड सॅनिटाझरच्या २५०० बाटल्या व १००० मास्क उत्तराखंड सरकारला नुकतेच दिले आहेत. कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाच्या कारखान्यांनी सध्या विविध उपक्रम हाती घेतले आहेत.