लवकरच धावणार तात्काळ विशेष रेल्वे
By admin | Published: May 10, 2015 11:55 PM2015-05-10T23:55:36+5:302015-05-10T23:55:45+5:30
अनेक वेळा अचानक प्रवास करण्याची गरज पडते किंवा गर्दीच्या हंगामात रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र, लवकरच या समस्येतून रेल्वे प्रवाशांची सुटका होऊ शकते.
नवी दिल्ली : अनेक वेळा अचानक प्रवास करण्याची गरज पडते किंवा गर्दीच्या हंगामात रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र, लवकरच या समस्येतून रेल्वे प्रवाशांची सुटका होऊ शकते. भारतीय रेल्वे लवकरच आपली ‘तात्काळ विशेष’ रेल्वे सुरू करणार आहे. तथापि, ही रेल्वे गर्दीच्या हंगामात चालविली जाणार असून यासाठी प्रवाशांच्या खिशाला काहीशी अधिक कात्री लागू शकते.
रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक संकटाचा सामना करणारा रेल्वे विभाग काही वर्दळीच्या मार्गांवर तात्काळचे शुल्क आकारून अशा विशेष गाड्या चालविणार आहे. या नव्या तात्काळ रेल्वे सुरू झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना अतिरिक्त सेवा मिळतील.
तात्काळ रेल्वेसाठी प्रवाशांनी नियमित भाड्याहून अधिक शुल्क द्यावे लागेल आणि ते १७५ ते ४०० रुपये यादरम्यान असेल. सध्या प्रिमिअम आणि दुरंतोसारख्या रेल्वेसाठी प्रवासभाड्यात बदल केलेला आहे. प्रिमिअम गाड्यांसाठी केवळ आॅनलाईन बुकिंग केली जाते. तत्काळ स्पेशलसाठी मात्र आॅनलाईन आणि काऊंटर अशा दोन्ही ठिकाणी तिकिटे उपलब्ध राहतील. सध्या द्वितीय श्रेणीसाठी तत्काळ प्रवासभाडे मूळ प्रवासदराच्या १० टक्के तर एसीसह अन्य सर्व श्रेणींसाठी ३० टक्के आकारले जाते.
प्रीमियम रेल्वेसाठी केवळ आॅनलाईन प्रणालीद्वारे तिकीट बुक केले जाऊ शकते. मात्र, तात्काळ विशेष रेल्वेसाठी तिकीट आॅनलाईन आणि काऊंटर या दोन्ही पद्धतींनी उपलब्ध होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पूर्वआरक्षणासाठी दिलासा
तात्काळ रेल्वेत पूर्वआरक्षणासाठीही मंत्रालयनाने काहीसा दिलासा दिला आहे. सध्या कोणत्याही रेल्वेत तात्काळ तिकीट केवळ २४ तासांपूर्वी आरक्षित केले जाऊ शकते. मात्र, या तात्काळ विशेष रेल्वेत कमीत कमी १० दिवस आणि अधिकाधिक ६० दिवसांपूर्वी आरक्षण केले जाऊ शकते.