सीमेवर तैनातीआधी सैनिकांना विशेष प्रशिक्षण!
By admin | Published: April 8, 2016 03:03 AM2016-04-08T03:03:10+5:302016-04-08T03:03:10+5:30
भारतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते. शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र. देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना
संकेत सातोपे, जम्मू
भारतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते. शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र. देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना शांतता क्षेत्र, तर जम्मू- काश्मीर, सियाचीनसारख्या अस्वस्थ सीमांना युद्धक्षेत्र म्हणण्यात येते. जवानापासून ते उच्चपदस्थापर्यंत प्रत्येकाला तीन वर्षे युद्धक्षेत्रात आणि तीन वर्षे शांतता क्षेत्रात तैनात करण्यात येते. मात्र, युद्धक्षेत्रात तैनात करण्यात येण्यापूर्वी प्रत्येक सैनिकाला विशेष प्रशिक्षण देण्यात येते. एलओसीलगतच चालणारे हे अत्यंत कठोर प्रशिक्षण जम्मू दौऱ्यातील पत्रकारांना पाहता आले.
शांतता क्षेत्रातून आलेल्या सैनिकाला सीमेवर उभे राहण्यासाठी शारीरिक आणि मानिसकदृष्ट्या तयार करण्याचे काम ‘बॅटल स्कूल’मध्ये करण्यात येते. त्या-त्या भागातील सीमेवरील समस्या आणि आव्हानांची माहिती करून देत जवानांना तेथील भूगोल आणि वातावरणासाठी तयार केले जाते. लष्कराच्या सादर्नत कमांडमध्ये अशी चार बॅटल स्कूल आहेत.
जम्मू भागात सरोल येथे हे ‘बॅटल स्कूल’ आहेत. येथे एकाच वेळी १,८०० ते १,९०० जवानांना प्रशिक्षण देण्यात येते. दोन्ही खांद्यांचा वापर करून बंदूक चालविणे, अचूक लक्ष्यभेद करणे, अडथळ्यांची शर्यत आदी अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात.
येथे प्रत्येक जवानाची वैद्यकीय चाचणी केली जाते. तसेच मानसशास्त्रांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येते, यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच पुढे सीमेवर तैनात केले जाते. या युद्ध प्रशिक्षणामुळे सीमेवर होणारे मृत्यू आणि आत्महत्यांचे प्रमाण खूपच कमी करण्यात यश आल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखांनी ‘लोकमत’ला सांगितले.शत्रूकडून वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे, भूसुरुंग, आयईडी आदींचे प्रकार ते ओळखण्याची आणि निकामी करण्याची पद्धत प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्यात येते. ‘मोअर स्वेट इन पीस, लेस ब्लड इन वॉर’ हे या प्रशिक्षण केंद्राचे ब्रीद आहे. त्यानुसार येथे जवानांकडून दिवस-रात्र घाम गाळून घेण्यात येतो. त्याचेच सकारात्मक परिणाम सीमेवरील लष्करी कारवायांमध्ये दिसून येत आहेत.सीमेवर गस्त घालण्याच्या दृष्टिकोनातून जवानांना वेगवेगळ््या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात ‘सेन्सिंग द डेंजर’ या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. यात जवानाला जंगलात नेऊन आवाज, प्रकाश किंवा अन्य गोष्टींच्या माध्यमातून घुसखोरांच्या हालचालींचा सुगावा घ्यायला शिकविले जाते.