काश्मिरी दगडखोरांना रोखण्यासाठी खास महिला बटालियन

By admin | Published: April 28, 2017 03:13 AM2017-04-28T03:13:28+5:302017-04-28T03:13:28+5:30

जम्मू-काश्मीरमधील बिघडती स्थिती हाताळण्यासाठी आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या जमावांमध्ये आता महिलाही

Special women battalion to stop Kashmiri stones | काश्मिरी दगडखोरांना रोखण्यासाठी खास महिला बटालियन

काश्मिरी दगडखोरांना रोखण्यासाठी खास महिला बटालियन

Next

 नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बिघडती स्थिती हाताळण्यासाठी आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या जमावांमध्ये आता महिलाही खुलेआम रस्त्यावर उतरू लागल्या आहेत हे लक्षात घेऊन काश्मीरसाठी १००० महिलांची बटालियन उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या विकासासाठी ८० हजार कोटी रुपयांचे केंद्रीय पॅकेज नोव्हेंबर २०१५ मध्ये जाहीर केले होते. त्यापैकी २० हजार कोटी रुपये आतापर्यंत राज्याला दिले गेले आहेत. यातून हाती घेतलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या बैठकीत हा महिला बटालियनचा निर्णय घेण्यात आला.
‘इंडिया रिझर्व्ह बटालियन’ (आयआरबी) नावाचे स्वतंत्र सशस्त्र सुरक्षा दल उभारण्याचे सरकारने यापूर्वीच ठरविले असून देशभरात अशा १४४ बटालियन्स कार्यरत आहेत. याखेरीज आंध्र व तेलंगणात चार, नक्षल प्रभावित राज्यांमध्ये १२ तर जम्मू-काश्मीरमध्ये अशा पाच बटालियन उभारण्यात येणार आहेत. काश्मीरसाठी ज्या पाच ‘आयआरबी’ बटालियन मंजूर झाल्या आहेत त्यापैकी एक बटालियन पूर्णपणे महिलांची असावी, असे या बैठकीत ठरल्याचे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
महिलांची बटालियन सर्वसाधारणपणे राज्य पोलिसांच्या मदतीसाठी असेल, पण जमावाकडून होणाऱ्या दगडफेकीच्या वेळी तिचा प्रामुख्याने वापर होईल. अशी प्रत्येक बटालियन उभारण्यासाठी ६१ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ७५ टक्के खर्च केंद्र सरकार देईल. शक्यतो या बटालियन ज्या त्या राज्यात कार्यरत असतील. परंतु गरज पडल्यास त्या अन्य राज्यांमध्येही पाठविल्या जाऊ शकतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुमारे सहा हजार महिलांचे अर्ज-
काश्मीरमधील पाच ‘आयआरबी’ बटालियन्ससाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण पाच हजार पदांसाठी १.४० लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे सहा हजार उमेदवार महिला आहेत. त्यामुळे या महिला अर्जदारांंमधून फक्त महिलांची स्वतंत्र बटालियन उभारण्याचे ठरविण्यात आले. शिवाय सुरक्षा दलांमध्ये महिलांचे प्रमाण हळूहळू ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या धोरणाशी हे सुसंगत आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.
पंतप्रधानांच्या पॅकेजमधून २० हजार कोटी
केंद्राने पंतप्रधानांच्या ८० हजार कोटी रुपयांच्या विकास पॅकेजपैकी २० हजार कोटी रुपयांची रक्कम जम्मू आणि काश्मीरला अदा केली आहे.

काश्मिरात हल्ला; कॅप्टनसह ३ शहीद
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात
एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत. स्थानिकांनी जमाव जमवून दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना जमावावर कारवाई करावी लागली. यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा सायंकाळी मृत्यू झाला.

Web Title: Special women battalion to stop Kashmiri stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.