हायस्पीड रेल्वेचा वेग ताशी ३५० किलोमीटर
By admin | Published: December 20, 2015 10:56 PM2015-12-20T22:56:00+5:302015-12-20T22:56:00+5:30
भारत आणि जपान यांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गाच्या बांधकामाला २०१७ पासून प्रारंभ होईल
नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेमार्गाच्या बांधकामाला २०१७ पासून प्रारंभ होईल आणि २०२३ च्या प्रारंभी देशाची पहिली बुलेट ट्रेन धावताना दिसण्याची शक्यता आहे. या रेल्वेचा कमाल वेग ताशी ३५० कि. मी. असेल.
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या भारत दौऱ्यात उभय देशांमध्ये झालेल्या करारानुसार या ५०८ कि. मी. लांबीचा हायस्पीड रेल्वेमार्ग, स्थानके आणि अन्य सुविधांचे निर्माणकार्य पाच वर्षांत पूर्ण केले जाईल. त्याशिवाय एक ते दीड वर्षे पूर्वतयारीसाठी लागतील, असे रेल्वे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
करारानुसार मुंबईच्या बांद्रा-कुर्ला संकुलात रेल्वेस्थानक बनविले जाईल. ही बुलेट ट्रेन या स्थानकावरून भुयारी मार्गाने महानगराबाहेर निघेल आणि काही उंचीवर बांधलेल्या रेल्वेमार्गाने धावत अहमदाबाद येथे पोहोचेल. तेथे अहमदाबाद हेच मुख्य स्थानक असेल, जेथे प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या रेल्वेगाड्या पकडता येतील. साबरमती येथे गाडीचे यार्ड तयार केले जाईल आणि रेल्वेमार्ग शहरी भागांतील पुलांवरून जाईल.
प्रारंभी जपानहून १० ते १२ रँक मागविण्यात येतील आणि नंतर मेक इन इंडियांतर्गत त्यांची संख्या वाढविण्यात येईल. प्रारंभी हे रँक १० डब्यांचे असतील आणि त्यात ७५० प्रवासी बसू शकतील. त्यानंतर १६ डब्यांचे रँक चालविण्यात येतील. हे रँक मेट्रोच्या धर्तीवर इलेक्ट्रिक मल्टिपल युनिटसारखेच असतील आणि ते अवघ्या काही सेकंदातच पूर्ण वेग पकडतील.
या रेल्वेमार्गाचा किमान २७ कि.मी.चा भाग सुरुंगाचा, १२२ कि.मी.चा भाग पुलांचा आणि उर्वरित भाग जमिनीवर राहील. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भडोच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ रेल्वेस्थानके असतील.