Child Safety on Two Wheeler: लहान मुलांना दुचाकीवरुन नेताय? केंद्र सरकारनं बनवला नवीन नियम, जाणून घ्या, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 04:42 PM2021-10-26T16:42:36+5:302021-10-26T16:50:40+5:30
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय रस्ते परिवहन वाहतूक मंत्रालयाने नवीन नियमावली (Motor Vehicle Act for Child Safety) काढली आहे.
नवी दिल्ली – अनेकदा आपण बाईकवरुन जाताना लहान मुलांना विनासुरक्षा पाहिलं असेल. मुलांना दुचाकीवरुन नेताना वाहतूक नियमांचेही सर्रासपणे उल्लंघन होतं. कधीकधी क्षमतेपेक्षा अधिक जणांना घेऊन प्रवास केला जातो. याचे फोटो आणि व्हिडीओही बऱ्याचदा व्हायरल झालेत. दुचाकी अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारनं याबाबत कठोर पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे.
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय रस्ते परिवहन वाहतूक मंत्रालयाने नवीन नियमावली (Motor Vehicle Act for Child Safety) काढली आहे. यात ४ वर्षापर्यंतच्या मुलांना दुचाकीवरुन नेताना बाईकचं स्पीड नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ४ वर्षापर्यंतच्या मुलाला घेऊन बाईकवरुन प्रवास करत असाल तर दुचाकीचा वेग ४० किमी. प्रति तासापेक्षा अधिक नको असं मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने याबाबत ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे.
या प्रस्तावात म्हटलंय की, ९ महिन्यापासून ४ वर्षापर्यंत लहान मुलांना प्रवासावेळी क्रॅश हेल्मेट वापरायला हवं हे वाहन चालकाने ध्यानात ठेवावं. म्हणजे लहान मुलांच्या डोक्यात व्यवस्थित फिट बसेल असं हेल्मेट हवं. तसेच ते ISI प्रमाणित असावं. ४ वर्षापेक्षा कमी प्रवासी असेल तर ४० किमी प्रति तासापेक्षा अधिक स्पीड नको. तसेच ४ वर्षापेक्षा कमी मुलांना दुचाकीवर बसवताना वाहन चालकासोबत चिटकून बसण्यासाठी सेफ्टी हार्नेसचा वापर करावा असं ड्राफ्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
काय आहे सेफ्टी हार्नेस?
सेफ्टी हार्नेस ही एक प्रकारची बनियान असते जी लहान मुलांना घालता होते. ही एडजस्टेबल असेल. ज्यात एक जोडी स्ट्रेप असतील जे बनियानला जोडलेले असतील. त्यात एक शोल्डर लूप असेल. जे ड्रायव्हरला घातलं जाईल. त्यामुळे लहान मुलाच्या शरीराचा पुढील भाग सुरक्षितपणे चालकाच्या पाठीमागे चिपकलेला असेल. केंद्रीय रस्ते वाहन परिवहन मंत्रालयाने या नव्या नियमावलीसाठी सर्वसामान्य जनतेकडून सूचना आणि आक्षेप मागवले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते.
मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी वाहनावर दोन वयस्कांसोबत ४ वर्षापेक्षा अधिक वयाचा मुलगा बसला असेल तर त्याला त्रिपल सीट मानलं जाईल. दुचाकीवर केवळ २ जणांनाच बसण्याची परवानगी आहे. जर ४ वर्षापेक्षा अधिक वयाचा मुलगा बसला तर तुम्हाला चलान भरावा लागेल. ओवरलोडिंग नियमांचे उल्लंघन केल्यावर १ हजारांचा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात येतो.