तब्बल १२८ चा वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला आणि ३ गाड्या धडकल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 05:29 AM2023-06-04T05:29:54+5:302023-06-04T05:32:12+5:30

अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून बालासोर येथे आले.

speed of 128 and wrong signal changed track and 3 railway collided at balasore odisha | तब्बल १२८ चा वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला आणि ३ गाड्या धडकल्या...

तब्बल १२८ चा वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला आणि ३ गाड्या धडकल्या...

googlenewsNext

बालासोर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओडिशातील रेल्वे अपघातासाठी कारणीभूत असलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली, तसेच जखमींची विचारपूस केली. (वृत्तसंस्था)

अशा धडकल्या तीन रेल्वेगाड्या

कोरोमंडल एक्स्प्रेसने रेल्वेमार्गाच्या लूप लाइनमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ६.५० वा. प्रवेश केला व तिथे उभ्या मालगाडीला जोरदार धडक दिली. कोरोमंडल ताशी १२८ किमी वेगाने धावत होती. तिने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने या गाडीचे डबे रुळावरून घसरले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ताशी ११६ किमी वेगाने येत होती. ती कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर धडकली.

रेल्वेकडून १० लाख मदत

मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून १० लाखांची, गंभीर जखमींना दोन लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

इंजिन ड्रायव्हर, गार्ड जखमी   

या अपघातात दोन रेल्वेगाड्यांचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मालगाडीचे इंजिन ड्रायव्हर व गार्ड या जखमी झाले नाहीत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा लोको पायलट, त्यांचा सहायक तसेच गार्ड व बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा गार्ड या अपघातात जखमी झाला.

४८ गाड्या केल्या रद्द

अपघातामुळे या मार्गावरील ४८ रेल्वेगाड्या रद्द केल्या.  ३९ रेल्वेगाड्या वळवून दुसऱ्या मार्गाने वळविल्या. चेन्नई-हावडा मेल, दरभंगा-कन्याकुमारी एक्स्प्रेस, कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या.

मानवी चुका, सिग्नलमधील बिघाडामुळे अपघात

मानवी चुका, सिग्नल यंत्रणेतील त्रुटी तसेच अन्य काही कारणे अपघातामागे असण्याची शक्यता आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसला मेन लाइनवर येण्यासाठी सिग्नल देण्यात आला होता. मात्र, नंतर तो सिग्नल बंद करण्यात आला. त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये प्रवेश करून उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली, असे अहवालात म्हटले आहे. बहानगा बाजार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर कोरोमंडल एक्स्प्रेसने लूप लाइनमध्ये संध्याकाळी उभ्या मालगाडीला धडक दिली.

मोदींनी मानले स्थानिक नागरिकांचे आभार...

- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या अपघातातील प्रत्येक जखमी व्यक्तीवर सर्वोत्तम उपचार केले जातील. रेल्वे अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुढे येऊन बचावकार्यास सुरुवात केली होती. त्याबद्दल त्यांचे मोदी यांनी आभार मानले. 

- ते म्हणाले की, अपघातस्थळ तसेच रुग्णालयांतील दृश्ये पाहून माझ्या मनाला वेदना झाल्या. रेल्वे अपघातामुळे जी विदारक स्थिती निर्माण झाली आहे त्यातून बाहेर येण्यासाठी ईश्वर आम्हाला शक्ती देवो.

अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिल्लीहून बालासोर येथे आले. अपघातस्थळाची पाहणी तसेच रुग्णांची विचारपूस करताना मोदी यांच्या समवेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.


 

Web Title: speed of 128 and wrong signal changed track and 3 railway collided at balasore odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.