जलसिंचनावर सीएसआर निधी खर्च करा - शेखावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 02:50 AM2019-09-26T02:50:44+5:302019-09-26T02:50:49+5:30
कंपन्यांना आवाहन; राष्ट्रीय जल अभियानात महाराष्ट्र देशात दुसरा
नवी दिल्ली: सर्वाधिक पाणी वापरणाऱ्या खासगी कंपन्या सीएसआर निधीतील रक्कम जलसिंचन, जलसंवर्धनासाठी वापरत नाहीत, अशी खंत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय जल अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास मिळालेला दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी स्वीकारला.
पिण्यासाठी, कृषीसाठी व त्याखालोखाल उद्योगधंद्यांसाठी लागणाºया पाण्याची गरज भागवण्यास आतापासून उपाय योजावे लागतील, अन्यथा भविष्यात संकट उभे राहिल, असा इशारा देत शेखावत म्हणाले की, खासगी कंपन्या सीएसआर निधीतील ४ टक्के रक्कमच पाणी व्यवस्थापन, जल संवर्धन, सिंचन यांवर खर्च करतात. सर्वाधिक पाणी वापरणाºया कंपन्या अवघा ११ टक्के खर्च पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करतात. हे प्रमाण वाढायला हवे. याप्रसंगी चहल म्हणाले की, गोदावरी खोºयातील पाणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले. ई सोर्स मॉडेलिंगचा प्रभावी वापर त्यासाठी महाराष्ट्राने केला होता. राज्याला मिळालेला सन्मान मोठाच आहे. अभियानाचे पुरस्कार राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात व मध्य प्रदेशलादेखील मिळाले.
बापू साळुंखे यांचाही सन्मान
स्वत:च्या शेतात प्रयोग करुन जलपातळी वाढवणारे शेतकरी बापू भाऊसाहेब साळुंखे यांना व्यक्तिगत श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतजमिनीतील पाणीपातळी त्यांनी २० टक्क्यांनी वाढवली. चंदगडसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील वडनेरभैरव गावातील साळुंखे यांचे उत्पन्न प्रचंड वाढले. त्यांनी २००४ पासून प्रयोग सुरू केला. ‘वाल्मी’त प्रशिक्षण घेतले. शेताजवळ डोंगरातील पाणी अडवले. शेततळी बांधली. नावीन्यपूर्ण प्रयोगांआधी त्यांना फक्त २ एकरास पाणी वापरता येई. आता २२ एकरांना हे पाणी पुरते.