गंगेच्या स्वच्छतेसाठी १८ हजार कोटींचा खर्च, गडकरींनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 03:33 AM2018-09-24T03:33:18+5:302018-09-24T03:33:44+5:30
गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली - गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सरकारने चालविलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून १८ हजार कोटी रुपये खर्चून सात राज्यांमध्ये सिव्हरेज प्रकल्प तयार करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक तसेच नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. सात राज्यांमध्ये दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे ११५ संयंत्र लावण्यात येणार असून, सिव्हरेज ढाचावर उपरोक्त खर्च होईल.
सोबतच नद्यांच्या किनाऱ्यांचा विकास आणि गंगा नदीवर राष्टÑीय जलमार्ग विकासाच्या माध्यमातून जल मालवाहतुकीला प्रोत्साहन देणाºया योजनाही राबविल्या जातील,अशी माहिती त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीत दिली.
गंगेला निर्मल बनविण्यासाठी सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल, हरियाणा आणि दिल्लीत १७,८७६.६९ कोटी रुपये खर्चून दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे ‘जलशोधन संयंत्र’ लावले जातील. गंगा नदीच्या विकासासाठी एकूण २४० योजना राबविला जात असून, त्यातच उपरोक्त ११५ प्रकल्पांचा समावेश आहे, असे गडकरी म्हणाले. (वृत्तसंस्था)
हृदयाशी जोडलेला मुद्दा...
नद्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणे हा माझ्या हृदयाशी जोडलेला मुद्दा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. २७ प्रकल्प पूर्ण झाले असून, ४२ प्रकल्पांचे काम सुरू आहे. सात प्रकल्पांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. अन्य ३४ प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. येत्या सहा महिन्यांमध्ये सफाईचे काम उल्लेखनीयरीत्या दिसून येईल, असा दावाही गडकरींनी केला.