SpiceJet Flight: Spicejetच्या विमानात तांत्रिक बिघाड; श्वास गुदमरल्याने महिला बेशुद्ध, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:17 PM2022-08-09T15:17:50+5:302022-08-09T15:18:32+5:30
SpiceJet Flight: गेल्या काही महिन्यांपासून स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता परत एकदा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून स्पाईसजेटच्या विमानांमध्ये अनेकदा तांत्रिक त्रुटी आढलून आल्या आहेत. आता पुन्हा एकदा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. रविवारी विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाच्या आत एसी सुरू न केल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इतकंच नाही तर श्वास गुदमरुन एक वृद्ध महिला विमानाच्या गेटवर बेशुद्ध पडली. तात्काळ विमानाचे दोन्ही दरवाजे उघडल्यानंतर प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला. सोशल मीडिया पोस्टमध्ये महिला प्रवाशाने ही घटना समोर आणली आहे.
दिल्लीच्या रहिवासी उषा कांता चतुर्वेदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये संपूर्ण घटनेचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहीले की, 'ही घटना 7 ऑगस्ट 2022 रोजी घडली आहे. मुंबईला जाण्यासाठी दिल्लीहून सकाळी 7.20 ला स्पाईसजेटचे विमान निघणार होते. पहाटे 3 वाजता उठून, 4.30 ला घरातून बाहेर पडले आणि 5.30 ला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. आमचे बोर्डिंग वेळेवर झाले आणि आम्ही विमान निघण्याची वाट पाहत बसलोत. पण, विमानात एसी नसल्यामुळे अचानक गर्मी वाढू लागली.'
'फ्लाइट अटेंडंटना विचारल्यावर उत्तर मिळाले की, इंजिन नुकतेच सुरू झाले आहे, हळूहळू विमान थंड होईल. पण, काही वेळानंतर आतमध्ये गुदमरल्यासारखे वातावरण निर्माण झाले. प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी फ्लाइट अटेंडंटला बोलावण्यासाठी बेल वाजवण्यास सुरुवात केली, परंतु कोणीही बाहेर येऊन प्रतिदास दिला नाही. ना विमानाने उड्डाण केले ना विमानातील हवेचा दबाव ठीक झाला. विमानाच्या दाराजवळ एक वृद्ध महिला बेशुद्ध होऊन पडली. यानंतर प्लाईट अटेंडंटने विमानाचे दोन्ही बाजूचे दरवाजे उघडले.'
चाचणीशिवाय विमान तयार केले?
त्यांनी पुढे सांगितले की, 'या सर्व प्रकारानंतर इंजिन काम करत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे आम्हा सर्वांना धक्काच बसला. चाचणीशिवाय विमान उड्डाणासाठी कसे तयार केले? असा प्रश्न आम्ही विचारला. प्रवाशांचा संताप आणि बिघडलेली स्थिती पाहून आम्हा सर्वांना बसने परत विमानतळाच्या आत पाठवण्यात आले. कुणाला महत्त्वाच्या मीटिंगसाठी जायचे होते, कुणाला आपल्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्काराला जायचे होते. 11 वाजेपर्यंत विमान टेक ऑफ झाले नाही, अखेर कंटाळून आम्हाला आमची तिकीटे रद्द करावी लागली." दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्यापपर्यंत स्पाईसजेटकडून कोणतेही विधान आलेले नाही.
इसजेट 50% उड्डाणे सुरू
भारतातील विमान कंपन्यांमध्ये तांत्रिक दोष सातत्याने समोर येत आहेत. याच कारणामुळे विमान वाहतूक नियामक डीजीसीएनेही अनेक विमान कंपन्यांवर कारवाई केली आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार, स्पाइसजेट सध्या 50 टक्क्यांहून अधिक उड्डाणे चालू शकत नाही. विशेष म्हणजे जुलैमध्ये डीजीसीएने 8 आठवड्यांच्या कालावधीसाठी एअरलाइनच्या फ्लाइटवर बंदी घातली होती. याचे कारण म्हणजे 19 जून ते 5 जुलै दरम्यान स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या किमान आठ घटना घडल्या.