Spicejet Plane: ‘स्पाइसजेट’च्या विमानात पुन्हा गडबड; चीनला जाणाऱ्या विमानाची कोलकात्यात इमरजंसी लँडिंग
By ओमकार संकपाळ | Updated: July 6, 2022 15:00 IST2022-07-06T14:59:41+5:302022-07-06T15:00:54+5:30
Spicejet Plane: स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची गेल्या 18 दिवसांतील ही आठवी घटना आहे. काल एका विमानाची पाकिस्तानात इमरजंसी लँडिंग झाली होती.

Spicejet Plane: ‘स्पाइसजेट’च्या विमानात पुन्हा गडबड; चीनला जाणाऱ्या विमानाची कोलकात्यात इमरजंसी लँडिंग
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत स्पाइसजेट (SpiceJet) ची विमाने वादात सापडली आहेत. काल एका फ्लाईटला पाकिस्तानात उतरववावे लागल्याचा प्रकार ताजा असताना सायंकाळी मुंबईतही एका स्पाईसजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे. त्यानंतर आता आज कोलकात्यातमध्येही तसाच प्रकार घडला आहे. चीनला जाणाऱ्या कार्गो विमानात गडबडी आढळल्यामुळे कोलकत्यात इमरजंसी लँडिंग करावी लागली.
18 दिवसात आठ घटना
याबाबत कंपनीने सांगितले की, त्यांचे एक मालवाहू विमान मंगळवारी चीनला जात होते, पण विमानातील हवामानची माहिती देणारे रडार बिघडल्यामुळे विमान कोलकाता येथे परतले. चीनच्या चोंगकिंग शहराकडे निघालेल्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर रडार काम करत नसल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची गेल्या 18 दिवसांतील ही आठवी घटना आहे.
DGCA ने स्पाइसजेटला बजावली नोटीस
स्पाइसजेटच्या विमानांच्या सततच्या बिघाडानंतर बुधवारी कंट्रोलर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) ने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या 18 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. स्पाईसजेटच्या DGCA द्वारे सप्टेंबर 2021 च्या ऑडिटमध्ये असे आढळून आले की, स्पेअर्स पुरवठादारांना नियमितपणे पैसे दिले जात नाहीत, ज्यामुळे स्पेअरची कमतरता होती. DGCA ने म्हटले आहे की, स्पाईसजेट विमान नियम, 1937 अंतर्गत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा सुनिश्चित करण्यात अयशस्वी ठरली आहे.
कंपनी मोठ्या तोट्यात
स्पाईसजेट एअरलाईन गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात आहे. स्वस्त सेवा देणाऱ्या स्पाइसजेटला 2018-19 मध्ये 316 कोटी रुपये, 2019-2020 मध्ये 934 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 998 कोटी रुपयांचा तोटा झाला. विमान वाहतूक क्षेत्र कोरोना महामारीतून सावरत आहे. विमान वाहतूक सल्लागार कंपनी CAPA ने 29 जून रोजी सांगितले की, भारतीय विमान कंपन्यांचा तोटा 2021-22 मध्ये 3 अब्ज डॉलरवरून 2022-23 मध्ये 1.4 ते 1.7 अब्ज डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो.