हेरगिरीने राष्ट्रहितही धोक्यात
By admin | Published: February 22, 2015 01:43 AM2015-02-22T01:43:52+5:302015-02-22T01:43:52+5:30
तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे.
नवी दिल्ली : तेल मंत्रालयातील खळबळजनक कॉर्पोरेट हेरगिरीप्रकरणी जप्त करण्यात आलेले दस्तऐवज राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून आरोपींनी राष्ट्रहिताशी तडजोड केली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसह १२ आरोपींवर शासकीय गोपनीयता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकतो, असा दावा दिल्ली पोलिसांनी शनिवारी स्थानिक न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने अटकेतील पाच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हेरगिरी प्रकरणाच्या तपासाला गती देत अटकेत असलेला ऊर्जा सल्लागार प्रयास जैन याच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर नोएडामधील एका पेट्रोकेमिकल कंपनीच्या कार्यालयावरही शनिवारी धाड घातली.
पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या पाच कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खनगवाल यांच्यासमक्ष हजर करून त्यांची कसून चौकशी करण्याच्या दृष्टीने पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या चौकशीसाठी संबंधित मंत्रालयांशीही संपर्क करावा लागणार आहे. समोरासमोर बसवून जाबजबाबासाठी त्यांची कोठडी मिळणे आवश्यक आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.