'आप फोडा आणि भाजपात या, CBI-ED ची केस बंद करतो', मनिष सिसोदियांचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:08 PM2022-08-22T13:08:39+5:302022-08-22T13:09:53+5:30
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. भाजपाकडून ऑफर मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली-
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. भाजपाकडून ऑफर मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आम आदमी पक्ष फोडा आणि भाजपात या सर्व सीबीआय व ईडीच्या सर्व केस बंद करतो, अशी ऑफर दिली गेली असल्याचं सिसोदिया म्हणाले.
मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत भाजपावर आरोप केला आहे. "माझ्याकडे भाजपाकडून मेसेज आला आहे. 'आप' तोडून भाजपामध्ये या, सर्व CBI, ED च्या केस बंद करून टाकतो. माझं भाजपाला सांगू इच्छितो मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे. शिर धडापासून वेगळं झालं तरी चालेल पण भ्रष्टाचारी आणि षडयंत्र रचणाऱ्यांसमोर झुकणार नाही. माझ्याविरोधातील सर्व गुन्हे खोटे आहेत. काय करायचं ते करा", असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं आहे.
मेरे पास भाजपा का संदेश आया है- “आप” तोड़कर भाजपा में आ जाओ, सारे CBI ED के केस बंद करवा देंगे
— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2022
मेरा भाजपा को जवाब- मैं महाराणा प्रताप का वंशज हूँ, राजपूत हूँ। सर कटा लूँगा लेकिन भ्रष्टाचारियो-षड्यंत्रकारियोंके सामने झुकूँगा नहीं। मेरे ख़िलाफ़ सारे केस झूठे हैं।जो करना है कर लो
गुजरात दौऱ्यावर निघाले सिसोदिया
मनिष सिसोदिया यांनी भाजपावरील आरोप गुजरात दौऱ्याला रवाना होण्याच्या ठीक एक दिवस आधी केला आहे. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर निघाले आहेत. सिसोदिया यांनी याआधी देखील यासंदर्भात ट्विट केलं होतं. "अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर जात आहे. गुजरातची जनता केजरीवाल यांना संधी देऊ इच्छित आहे. भाजपाकडून गेल्या २७ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य क्षेत्रात गुजरातमध्ये कोणतीच प्रगती झालेली नाही. आता आम्ही करून दाखवू", असं मनिष सिसोदिया यांनी म्हटलं होतं.
मनिष सिसोदियांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचा दावा
मनिष सिसोदिया यांनी भाजपामध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली असल्याचा दावा केला असतानाच सिसोदिया यांना भाजपानं थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असा खुलासा 'आप'नं केला आहे. "मनिष सिसोदिया यांनी भाजपा नेत्यांना सांगितलं की त्यांचं स्वप्न मुख्यमंत्री बनण्याचं नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे हे आहे", असं आप नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं.
भाजपाचे नेते आधी पत्रकार परिषद घेतात आणि सीबीआय, ईडीच्या कारवाईची धमकी देतात. त्यानंतर लगेच या तपास संस्थांकडून कारवाई होते. महागाई अशीच वाढत राहिली पाहिजे आणि त्यास विरोधी पक्षांनी विरोध करु नये अशी केंद्र सरकारची इच्छा असल्याचा आरोप, सिसोदिया यांनी केला आहे.