प.बंगाल आणि आसाममध्ये उत्स्फूर्त मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 07:42 PM2016-04-11T19:42:11+5:302016-04-11T19:42:11+5:30
प. बंगालमध्ये पहिल्या टप्पातील उर्वरित ३१ तर आसामात दुसऱ्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही राज्यांमध्ये ७१ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली.
किरकोळ हिंसाचार : आसामच्या बारपेटा जिल्ह्यात एक ठार
कोलकाता/ गुवाहाटी : प. बंगालमध्ये पहिल्या टप्पातील उर्वरित ३१ तर आसामात दुसऱ्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही राज्यांमध्ये ७१ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली. आसाममध्ये तुरळक हिंसाचारात एक जण ठार झाला.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे १९९१ पासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी दिल्लीहून दिसपूर येथे जाऊन तेथील शासकीय शाळेतील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. आसामचे कुस्तीपटू शिव थापा यांनीही कुटुंबीयांसह मतदान केले. आसाममध्ये १२,६९९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपेपर्यंत रांगा लागल्या होत्या. प. बंगालमधील पश्चिम मिदनापूर मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत विक्रमी ७६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. बांकुरा ७०.८० तर बर्दवानमध्ये ६८ टक्के मतदान झाले. (वृत्तसंस्था)
-----------------------------
सीआरपीएफकडून हवेत गोळीबार...
कामरूप जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका जवानाने गर्भवती महिलेसोबत गैरवर्तन केल्यामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी निदर्शने केली असता सुरक्षा दलाने त्यांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. चायगोन येथील नित्यसार खुलाबाजार एलपी शाळेतील मतदान केंद्रावर एक महिला बाळाला घेण्यासाठी पुन्हा मतदानकक्षात जात असताना एका जवानाने तिला रोखल्यामुळे जमाव संतप्त झाला होता. आसामच्याच बारपेटा जिल्ह्यातील सोरभोग मतदारसंघात सीआरपीएफ आणि मतदारांमध्ये झालेल्या संघर्षात ८० वर्षीय वृद्ध ठार झाला तर दोन जवानांसह तिघे जखमी झाले.