'भारताला कोणाचेही ऐकण्याची...; पाकिस्तानच्या धमकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिले प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 02:29 PM2022-10-20T14:29:45+5:302022-10-20T14:48:54+5:30
भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे.
नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली आहे. यात पीसीबीने निराशा व्यक्त केली. यावर आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पीसीबीला प्रत्युत्तर दिले आहे.
" पीसीबीच्या ब्लॅकमेल पत्राला बीसीसीआय उत्तर देईल आणि २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे. पुढील वर्षीही विश्वचषक होणार असून जगभरातील संघही खेळणार आहेत. भारताला कोणाचेही ऐकण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर अनुराग ठाकूर यांनी दिले.
"आज भारत कोणत्याही क्षेत्रात नाकारला जाऊ शकत नाही आणि क्रिकेट जगतात मोठे योगदान आहे. विश्वचषक भारतात होणार आहे, तो भव्य आणि ऐतिहासिक असेल. पाकिस्तानमध्ये सुरक्षेची चिंता असल्याने गृह मंत्रालय निर्णय घेईल. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला भेट दिली, पण त्यांची भारताशी तुलना करता येईल का?, असा सवालही ठाकूर यांनी केला.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निर्णयानुसार, पाकिस्तान पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.
जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं
भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी बैठकीनंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जाहीर केले आणि ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) लांबलचक पत्र काढून टीका केली आहे.
“पुढील वर्षी होणारी आशिया चषक तटस्थ ठिकाणी हलवण्यासंदर्भात आशियाई क्रिकेट परिषदेचे ( एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी काल केलेल्या विधानाबाबत पीसीबीने आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( यजमान) यांच्याशी चर्चा किंवा सल्लामसलत न करता आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम यांचा कोणताही विचार न करता हे विधान केले गेले आहे,''असे पीसीबीने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
"पाकिस्तानला एसीसी बोर्ड सदस्यांचा जबरदस्त पाठिंबा आणि प्रतिसाद मिळाल्याने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद दिले गेले. शाह यांचे आशिया चषक स्थलांतरित करण्याचे विधान स्पष्टपणे एकतर्फी आहे. हे तत्त्वज्ञान आणि भावनेच्या विरुद्ध आहे. एक संयुक्त आशियाई क्रिकेट मंडळ तिच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि आशियातील क्रिकेट खेळाचे आयोजन, विकास आणि प्रचार करण्यासाठी सप्टेंबर १९८३ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना करण्यात आली होती.''