"आम्ही सगळी मदत केली आहे पण..."; विनेशला अपात्र ठरवल्यानंतर सरकारने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:19 PM2024-08-07T16:19:52+5:302024-08-07T16:26:04+5:30
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत निवेदन दिले.
Vinesh Phogat Disqualified: कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आल्याने भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसला आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी वजन करताना विनेशचे वजन १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. विनेशला अपात्र ठरवल्याने भारताची सुवर्णसंधी हुकली आहे. विनेशला अपात्र ठरवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अशातच केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही या सगळ्या प्रकरणावर सरकारकडून स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याबद्दल क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत निवेदन दिले. विनेश फोगटलाअपात्र का ठरवण्यात आले आणि सरकार याबाबत काय करत आहे याची माहिती मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. सकाळी दोनदा विनेशचे वजन तपासण्यात आले. तिचे वजन ५० किलो १०० ग्रॅम असल्याचे आढळून आले. त्यानंतर विनेशला अपात्र ठरवण्यात आले. आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांकडे याबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे, असे मनसुख मांडविया म्हणाले.
"भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडेही निषेध नोंदवला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पीटी उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. आपल्याला न्याय मिळेल अशी आशा आहे. सरकारने विनेशला सर्वतोपरी मदत केली आहे. तिच्यासाठी वैयक्तिक कर्मचारी नियुक्त केले होते. प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील विनेशसाठी तैनात होते. अनेक स्पॅरिंग पार्टनर्स, स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग तज्ञांना पैसे दिले गेले आहेत," असेही मांडवीय यांनी सांगितले.
पीटी उषा यांनी घेतली विनेशची भेट
ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षा पीटी उषा यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. "थोड्या वेळापूर्वी मी विनेशला ऑलिम्पिक व्हिलेज पॉलीक्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारत सरकार आणि संपूर्ण देशाच्या पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व वैद्यकीय आणि भावनिक आधार देत आहोत. भारतीय कुस्ती महासंघ शक्य तितक्या मजबूत पद्धतीने याचा पाठपुरावा करत आहे. मला विनेशच्या वैद्यकीय पथकाने रात्रभर केलेल्या अथक प्रयत्नांची जाणीव आहे जेणेकरून ती स्पर्धेच्या गरजा पूर्ण करू शकेल," असे पीटी उषा यांनी म्हटलं.