क्रीडा मंत्रालयाचा डाव; कुस्ती महासंघ चितपट, नियमांचे पालन न केल्याने बरखास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:52 AM2023-12-25T05:52:33+5:302023-12-25T05:54:07+5:30
तीनच दिवसांत कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): तीनच दिवसांपूर्वी निवडून आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) कार्यकारिणी क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत बरखास्त केली. नवनिर्वाचित कार्यकारिणीने डब्ल्यूएफआयच्या घटनेचे पालन केले नाही. तसेच कुस्तीपटूंना तयारीसाठी पुरेसा वेळ न देता १५ आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची घाईघाईने घोषणा केली होती, असा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला.
नवी कार्यकारिणी पूर्णपणे माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे, जे राष्ट्रीय क्रीडासंहितेनुसार योग्य नाही. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांच्या पॅनलने विजय मिळविल्यावर त्याच दिवशी १५ आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा उत्तर प्रदेशच्या नंदिनीनगरमध्ये घेण्याची घोषणा केली. ही घोषणा घाईघाईने करण्यात आली असून कुस्तीपटूंना पुरेशी सूचना न देता निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
नव्या कार्यकारिणीने ब्रिजभूषण यांच्या बंगल्याच्या आवारातून काम सुरू केले आहे. याच ठिकाणी पूर्वीचे पदाधिकारी काम करत होते, तेथेच लैंगिक छळ झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. नवी कार्यकारिणी माजी पदाधिकाऱ्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे. अध्यक्षांकडून होणारा मनमानीपणा दिसून येतो, असाही ठपका ठेवण्यात आला.
खेळाडूंनी केला होता निषेध
संजय सिंह हे कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची, तर बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंह यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.
कामकाजासाठी नवी समिती
भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघाला (आयओए) तातडीने निष्पक्ष समिती स्थापन करण्यास सांगितले. आयओएच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डब्ल्यूएफआयच्या माजी पदाधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली सद्य:स्थिती पाहता महासंघाच्या प्रशासन आणि अखंडतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कुस्तीपटूंचे नुकसान होऊ नये यासाठी आयओएने तातडीने पावले उचलावीत.
मी निवृत्ती घेतली आहे...
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसह इतर अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असल्याने त्यांनी महासंघातून निवृत्ती घेतली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर ब्रिजभूषण यांनी ही टिप्पणी केली.
नव्याने निवडणुका घ्याव्यात...
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगाट म्हणाले की, या निर्णयामुळे खेळाडूंचे मनोबल वाढेल. सर्व राज्य संघटना बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात.
साक्षीने केले निर्णयाचे स्वागत
क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर साक्षी मलिक म्हणाली की, काहीतरी चांगले घडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. आम्ही कोणत्या उद्देशाने लढत आहोत हे सरकारला समजेल, अशी आशा आहे.
पुरस्कार परत घेणार नाही : पुनिया
पद्मश्री पुरस्कार परत करणारे बजरंग पुनिया म्हणाले, मी पुरस्कार परत घेणार नाही. आपल्या बहिणी आणि मुलींचा सन्मान हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. न्याय मिळाल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेईल.