राफेल विमानांच्या सौद्याचा मार्ग प्रशस्त
By Admin | Published: January 26, 2016 02:27 AM2016-01-26T02:27:46+5:302016-01-26T02:27:46+5:30
फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा मार्ग सोमवारी प्रशस्त झाला आहे. राफेल विमानांच्या विक्रीसंबंधी आंतर सरकारी करारावर(आयजीए) स्वाक्षरी झाली
नवी दिल्ली : फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा मार्ग सोमवारी प्रशस्त झाला आहे. राफेल विमानांच्या विक्रीसंबंधी आंतर सरकारी करारावर(आयजीए) स्वाक्षरी झाली असली तरी काही आर्थिक बाबींमुळे अंतिम करार प्रत्यक्षात येऊ शकला नाही. काही दिवसांतच हा मुद्दा निकालात निघण्याची आशा बळावली आहे. भारत-फ्रान्सदरम्यान सोमवारी राफेल आयजीसह रेल्वे, संस्कृती, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रातील एकूण १४ करार अस्तित्वात आले. भारत भेटीवर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोईस ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतर हे करार प्रत्यक्षात येऊ शकले.
दहशतवादाचा मुकाबला, सुरक्षा आणि नागरी अणुसहकार्य या मुद्द्यांना करारात प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे.
ओलांद यांच्यासोबत दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आर्थिक बाबी वगळता दोन देशांनी ३६ लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीबाबत आंतर सरकारी करारावर स्वाक्षरी केली
आहे.
या विमानाच्या सौद्यासंबंधी आर्थिक बाबी शक्य तेवढ्या लवकर निकालात काढल्या जातील. ओलांद यांनी आयजीएवरील स्वाक्षरी हे एक निर्णायक पाऊल असल्याचे संबोधले. हा सौदा अंदाजे ६० हजार कोटींच्या घरात असेल. दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्यासोबतच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये तर या महिन्यात पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधात सहकार्य बळकट करण्यावर चर्चेत लक्ष केंद्रित केले. ओलांद आणि मी दहशतवादविरोधी सहकार्य नव्या उंचीवर नेण्यास सहमत झालो आहोत. त्यामुळे कट्टरतावाद आणि दहशतवादाचा धोका निपटून काढण्यास मदत मिळेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांना पाकने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे, असे आवाहनही दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इसिसने आमच्यावर हल्ला केला. आमच्या मुलांची हत्या करणाऱ्यांवर आम्ही वारंवार प्रहार करू.
या कठीण परिस्थितीत आम्हाला समर्थन दिल्याबद्दल मी भारताला धन्यवाद देतो, फ्रान्स ही बाब कधीही विसरणार नाही. भारत आणि फ्रान्सने दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सहकार्य बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण दोन्ही देश दहशतवादाचे शिकार बनले आहेत, असे ओलांद यावेळी म्हणाले.