सपाप्रणीत आघाडी संजदने फेटाळली
By Admin | Published: September 19, 2015 02:29 AM2015-09-19T02:29:00+5:302015-09-19T02:29:00+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात स्थापित तिसऱ्या आघाडीचे अस्तित्व संयुक्त जनता दलाने फेटाळले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सोबतीने आमच्या
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात स्थापित तिसऱ्या आघाडीचे अस्तित्व संयुक्त जनता दलाने फेटाळले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या सोबतीने आमच्या पक्षाने तयार केलेली एकमेव आघाडी रिंगणात असल्याचा दावा संजदचे अध्यक्ष शरद यादव यांनी शुक्रवारी केला.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून काँग्रेससोबत जागावाटपावर चर्चा पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच महाआघाडीत मतभेदाच्या वृत्ताचा इन्कार केला. महाआघाडीतून विभक्त झाल्यानंतर मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीने समाजवादी जनता दल-लोकशाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पी.ए.संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीसह तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.
नितीश, लालूंची दांडी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या शनिवारी चंपारण जिल्ह्यात होणाऱ्या सभेला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव उपस्थित राहणार नाहीत. महाआघाडीचे हे नेते तिकीट वाटपात व्यस्त आहेत. यामागे कुठलेही राजकीय कारण शोधले जाऊ नये, असे संजदचे महासचिव के.सी. त्यागी यांनी सांगितले. नितीशकुमार यांनी अनुपस्थितीबाबत कुठलेही वक्तव्य केले नसले तरी महाआघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असून यादी १९ सप्टेंबरला जाहीर केली जाईल, असे टिष्ट्वट केले आहे. दरम्यान, राहुल यांच्या सभेला नितीशकुमार, लालूप्रसाद यांच्या अनुपस्थितीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली असतानाच या तिन्ही नेत्यांना लवकरात लवकर एका व्यासपीठावर आणून या चर्चेला पूर्णविराम देण्याची तयारी सुरू आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)