सपाच्या यादीने काँग्रेसच्या 'हाताला' थरथर!
By admin | Published: January 20, 2017 04:07 PM2017-01-20T16:07:02+5:302017-01-20T18:32:51+5:30
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षात आघाडी झाली असतानाच शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अचानक
Next
>ऑनालाइन लोकमत
लखनौ, दि. 20 - उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षात आघाडी होऊन दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत असतानाच शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अचानक सपाच्या 191 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. सपाने परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून, दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन उमेदवारांची यादी जाहीर करायची होती. पण सपाकडून आधीच उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय ज्या मतदार संघांची मागणी काँग्रेसने केली होती, तेथेही सपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने दोन्ही पक्षांमधील आघाडीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आघाडीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर सपाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
गौतमबुद्धनगर मधील तीन जागा तसेच नोएडा, दादरी आणि जेवर येथून सपाने आपले उमेदवार घोषित केले आहेत. परंतु यापैकी किमान एक जागा तरी आपणास मिळावी, अशी काँग्रेसची अपेक्षा होती. याबाबत अखिलेश यांचे निकटवर्तीय किरणमय नंदा यांनी अमेठी बरोबरच लखनऊ कँट मतदारसंघ सुद्धा सपा आपल्याकडे ठेवेल, असे स्पष्ट केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि सपा आघाडीमध्ये अर्धा डझन मतदारसंघातील उमेदवारीवरून मतभेद आहेत. सपा आपले मंत्री गायत्री प्रजापती यांच्यासाठी काँग्रेसचा अमेठी मतदार संघ घेण्यास इच्छुक आहे, तर त्याबदल्यात काँग्रेसला गौरीगंज मतदार संघ सोडण्याची तयारी सपाने दर्शवली आहे. मात्र या अदलाबदलीत काँग्रेस राय बरेली, बछरांवा, तिलोई, हरचंदपूर आणि उंचाहार मतदारसंघ मागत आहे. पण सपा कोणत्याही परिस्थितीती सरेनी आणि उंचाहार मतदारसंघ सोडण्यास तयार नाही आहे. सध्यस्थितीत सपा काँग्रेससाठी 80 जागा सोडण्यास तयार आहे, तर किमान 100 जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची इच्छा आहे. पण तेवढ्या जागा देऊन आपली पारंपरिक ताकद कमी करण्याची सपाची इच्छा नाही. असे केल्यास आपले पारंपरिक मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळतील अशी भीती सपाला वाटत आहे.