Sputnik Light: एका डोसमध्ये काम तमाम! दुसऱ्या डोसची कटकट नाही, लशीला DCGI ची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 10:37 PM2022-02-06T22:37:28+5:302022-02-06T22:38:18+5:30
Sputnik Light permission: ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या समितीने लसीच्या वापरासाठी दोन दिवसांपूर्वी शिफारस केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसविरोधात भारतीयांच्या हाती आणखी एक शस्त्र आले आहे. हे एवढे प्रभावी आहे की, एकाच डोसमध्ये दोन डोसची ताकद देते. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सिंगल डोसच्या स्पुतनिक लाईटच्या वापराला मंजुरी दिली आहे. डीसीजीआयकडून स्पुतनिक लाईटच्या वापराचा रस्ता मोकळा झाला आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढविण्यास मदत मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. स्पुतनिक लाईटच्या मंजुरीनंतर देशात आता नऊ लशी झाल्या आहेत. मांडविया म्हणाले की, कोरोनाविरोधातील लढाईला सामुहिक बळ मिळाले आहे.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या समितीने लसीच्या वापरासाठी दोन दिवसांपूर्वी शिफारस केली होती. स्पुतनिक लाईट लशीचा एक डोस घेतला की दुसऱ्या डोसची गरज राहणार नाही. आतापर्यंत देशात ज्या आठ लशी दिल्या जात आहेत, त्या सर्व डबल डोसच्या आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, कोवोव्हॅक्स, कॉबेव्हॅक्स, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि जी कोव्ह डी या लशी आहेत. रशियाच्या डबल डोसच्या स्पुतनिक व्ही लशीचा वापर देशात आधीपासून होत आहे.