Sputnik V Vaccine: स्पुटनिक व्ही लसीला DCGIची मंजुरी; जाणून घ्या किंमत अन् कितपत प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 11:23 AM2021-04-13T11:23:56+5:302021-04-13T11:24:16+5:30
Sputnik V Vaccine price effectiveness all question answered: स्पुटनिक व्ही लस एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला उपलब्ध होणार
नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर वाढत असताना तिसऱ्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. काल तज्ज्ञांच्या विशेष समितीनं रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी दिली. यानंतर आता भारतीय औषध नियंत्रक संस्थेनं (डीसीजीआय) स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. सध्याच्या घडीला देशात दोन लसींचा वापर सुरू आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ-ऍस्ट्राझेनेका यांच्या संशोधनातून तयार झालेल्या कोविशील्ड लसीचं उत्पादन सीरमनं केलं आहे. तर भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लस तयार केली आहे. सध्या या दोन लसींचा वापर देशभरात केला जात आहे. (Sputnik V Vaccine price effectiveness all question answered)
बापरे! अवघ्या 11 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन, प्रकृती चिंताजनक
कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर इतर देशांमध्येही सुरू आहे. त्यासाठी करारदेखील झाले असल्यानं भारतातून मोठ्या प्रमाणात लसींची निर्यात सुरू आहे. त्यामुळे देशात लसींचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळेच स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी देण्याक आली. स्पुटनिक व्ही लसीच्या उत्पादनासाठी भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबनं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडसोबत (आरडीआयएफ) करार केला आहे. आतापर्यंत ५९ देशांमध्ये स्पुटनिक व्ही लसीचा वापर सुरू आहे. त्यामुळे स्पुटनिक व्ही लसीला मंजुरी देणारा भारत ६० वा देश ठरला आहे.
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग! कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; तब्बल 102 जण पॉझिटिव्ह, परिस्थिती गंभीर
एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला देशात स्पुटनिक लसीचा वापर सुरू होईल. स्पुटनिक व्ही लस २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवता येते. ही लस साध्या फ्रीजमध्येही ठेवता येत असल्यानं तिच्या साठवणुकीसाठी वेगळी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता नाही. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन प्रमाणेच स्पुटनिक व्ही लसीचेदेखील २ डोस घ्यावे लागतात. दोन डोसमध्ये २१ दिवसांचं अंतर असावं लागतं.
स्पुटनिक व्ही लस ९१.५ टक्के प्रभावी आहे. याचा अर्थ स्पुटनिक व्ही लस कोविशील्ड आणि कोवॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पुटनिक व्ही लसीची किंमत १० डॉलर (७५० रुपये) इतकी आहे. मात्र स्पुटनिक व्ही लसीची भारतातील किंमत नेमकी किती असणार याबद्दल स्पष्टता नाही. यासाठी केंद्र सरकार उत्पादकांसोबत चर्चा करत आहे. त्यामुळे लसीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.