Honey Trap: हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानसाठी हेरगिरी, परराष्ट्र खात्यातील वाहन चालकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 08:02 AM2022-11-19T08:02:35+5:302022-11-19T08:03:06+5:30
Honey Trap: हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेला केंद्रीय परराष्ट्र खात्याचा एक वाहन चालक गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवीत होता. या हेरगिरीचे कारस्थान उजेडात आले असून, त्या वाहनचालकाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली : हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेला केंद्रीय परराष्ट्र खात्याचा एक वाहन चालक गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवीत होता. या हेरगिरीचे कारस्थान उजेडात आले असून, त्या वाहनचालकाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या वाहनचालकाला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू भवन येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. गोपनीय माहिती व काही कागदपत्रे एका पाकिस्तानी व्यक्तीला पाठविताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या माहितीच्या बदल्यात त्याला पैसे मिळणार होते. हनी ट्रॅपद्वारे महत्त्वाच्या खात्यातील, तसेच विभागातील लोकांना अडकवून त्यांच्याकडून हेरगिरीची कामे करवून घेतली जातात. भारतामध्ये याआधीही अशा प्रकरणांमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली होती.
‘सहानभूतीसाठी पाकिस्तानचे प्रयत्न’
पाक काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा टोला भारताने लगावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकने काश्मीरच्या विषयावर वक्तव्य केले, त्यामुळे भारताने पाकची कानउघाडणी केली आहे. भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथुर म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे पाकने नीट लक्षात ठेवावे. पाकला कांगावा करण्याची सवय लागली आहे.
‘पूनम शर्मा नावाने अडकला जाळ्यात’
पूनम शर्मा किंवा पूजा असे नाव धारण करून पाकिस्तानी व्यक्तीने परराष्ट्र खात्यातील वाहनचालकावर मोहिनी घातली होती, तसेच पैशाच्या आमिषानेही तो हेरगिरी करू लागला होता. याची कुणकुण लागताच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्याच्यावर बारीक नजर ठेवली होती. अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.