हमालाची नेत्रदिपक भरारी! लेकीसाठी झाला IAS; रेल्वे स्टेशनच्या मोफत WiFi वर केला अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 08:17 PM2023-09-17T20:17:41+5:302023-09-17T20:18:37+5:30
रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केलं आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा मार्ग स्वतःच बनवावा लागतो. ध्येयापर्यंत पोहोचणं कितीही कठीण असलं तरी प्रबळ इच्छाशक्तीने ते साध्य करत राहायला हवं. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केलं आहे.
केरळमधील एर्नाकुलम येथील रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथने आपल्या मुलीचं आयुष्य सुधारण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. या काळात त्याच्या वाटेवर ज्या काही अडचणी आल्या, त्याचा त्याने धैर्याने सामना केला. कोणत्याही क्षणी तो खचला किंवा मागे हटला नाही. अखेर आयएएस अधिकारी झाला.
श्रीनाथ हा केरळमधील मुन्नारचा रहिवासी आहे. तो एर्नाकुलम रेल्वे स्थानकावर हमाल म्हणून काम करत असे. या कामाच्या बदल्यात त्याला आपल्या मुलीची चांगली काळजी घेण्यासाठी पुरेसे पैसे मिळाले नाहीत. कमी उत्पन्नामुळे आपल्या मुलीला भविष्यात तडजोड करावी लागेल, अशी भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्याने हमाल म्हणून काम करण्याबरोबरच नागरी सेवा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
रेल्वे स्टेशनवरील मोफत वायफाय सुविधेचा वापर
UPSC कोचिंगमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीनाथचे उत्पन्न पुरेसे नव्हते. त्यामुळे त्याला सेल्फ स्टडीतून उत्तम तयारी करावी लागली. अभ्यासाचे साहित्य घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या मोफत वायफाय सुविधेचा वापर करून त्याने अभ्यास सुरू केला. प्रथम त्याने केरळ लोकसेवा आयोगात सरकारी नोकरीची तयारी केली. तो स्टेशनवर इअरफोन लावून नोट्स काढायचा.
यशामुळे वाढला आत्मविश्वास
केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेला लक्ष्य केले. तीन वेळा तो अपयशी ठरला पण हिंमत हारली नाही. त्याला स्वतःवर आणि आपल्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता. शेवटी, UPSC परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवून, तो IAS अधिकारी झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.