रावणाचा हवाई मार्ग शोधण्यासाठी श्रीलंका राबविणार संशोधन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:33 PM2020-07-21T22:33:35+5:302020-07-21T22:33:58+5:30
‘मिथके’ दूर करून अधिकृत माहिती शोधण्याचा उद्देश
नवी दिल्ली : ५ हजार वर्षांपूर्वी रावणाने वापरलेल्या ‘हवाई मार्गां’च्या शोधासाठी श्रीलंकेच्या उड्डयन प्राधिकरणाकडून विशेष संशोधन प्रकल्प होती घेण्यात येणार आहे. रावणाची विमाने आणि त्याने वापरलेले ‘हवाई मार्ग’ याबाबत अनेक कहाण्या प्रचलित आहेत. त्यातील अधिकृत माहिती शोधून काढणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
श्रीलंकेचा राजा असलेल्या रावणाने जगात सर्वप्रथम विमानाचा वापर केल्याचा दावा सिद्ध करण्यासाठी प्राचीन पुरावे देण्याचे आवाहन करणारी एक जाहिरात श्रीलंकेच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने नुकतीच सिंहली वृत्तपत्रात दिली आहे. त्यासंबंधीच्या बातम्या भारतीय वृत्तपत्रांत मागील दोन दिवसांत प्रसिद्ध होत आहेत. त्यानुषंगाने एका भारतीय वृत्तपत्राशी बोलताना श्रीलंकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘रावणाची विमाने आणि त्याने वापरलेले ‘हवाई मार्ग’ याबाबत अनेक मिथके प्रसिद्ध आहेत. त्यातून अधिकृत माहिती शोधून काढण्यासाठी एक संशोधन प्रकल्प श्रीलंका सरकार हाती घेणार आहे. अधिकाºयाने सांगितले की, श्रीलंकेचे पर्यटन खाते भारतीय पर्यटकांसाठी ‘रामायणा’स मोठ्या प्रमाणात महत्त्व देते.
रामायणात रावण खलनायक असला तरी श्रीलंकेत मात्र तो नायक आहे. भारतातील अनेक द्रविडी पक्ष आणि नेत्यांनीही रावणास नायक म्हणून स्वीकारल्याचे दिसते. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई आणि एम. करुणानिधी यांचा त्यात समावेश आहे. श्रीलंकेत रावण हा सामाजिक-धार्मिक आणि राजकीय दृष्ट्याही ‘राष्ट्रीय नायक’ मानला जातो. श्रीलंकेतील एक कट्टरवादी ‘सिंहल गट’ स्वत:ला ‘रावण बाळ्या’ म्हणवून घेतो. श्रीलंकेने अंतराळात पाठविलेल्या आपल्या पहिल्या उपग्रहाचे नाव ‘रावण-१’ असे ठेवले आहे.
राजा रावण वापरीत असे ‘दंडू मनोरा’ नावाचे विमान
२०१६ मध्ये एका परिषदेत भाषण करताना श्रीलंकेचे नागरी उड्डयनमंत्री निर्मल सिरिपाल डिसिल्व्हा यांनी म्हटले होते की, ‘जगाचा हवाई उड्डयन इतिहास राईट बंधूंपासून सुरू होतो; पण श्रीलंकेचा हवाई उड्डयन इतिहास पाच हजार वर्षांपूर्वी राजा रावणापासून सुरू होतो.