श्रीलंकेतील कारागृहात दंगल, 8 कैदी ठार तर 37 जण जखमी; पळून जाण्याचा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 04:28 AM2020-12-01T04:28:35+5:302020-12-01T07:53:09+5:30
कारागृहातील दोन अधिकारी जखमी
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरानजीक महारा या विभागातील कारागृहामध्ये रविवारी झालेल्या भीषण दंगलीत आठ कैदी ठार, तर ३७ जण जखमी झाले.. कोरोना साथीच्या भीतीने काही कैद्यांनी या कारागृहातून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
या कैद्यांनी कारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्यासाठी पोलिसांना वेठीस धरले. मात्र त्यांचे हे प्रयत्न पोलिसांनी अयशस्वी ठरविले. त्यावेळी कैद्यांनी केलेल्या दंगलीत आठ कैदी ठार तर ३७ जण गंभीर जखमी झाले. या कैद्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जखमी झालेल्यांमध्ये कारागृहातील दोन अधिकाºयांचाही समावेश आहे. या घटनेतील सर्व जखमींवर रागामा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रीलंकेत १० हजार कैदी मावतील अशा कारागृहांमध्ये सध्या २६ हजारांहून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत.
कोरोनाने कैद्यांत भीती
कोरोना संसर्गामुळे सध्या कैदी घाबरले असून आम्हाला गर्दी नसलेल्या तुरुंगात हलवावे अशी मागणी त्यांनी कारागृह अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र ती मान्य न झाल्याने कैदी संतप्त झाले होते. या कारागृहांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून श्रीलंकेतील तुरुंगांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला कारण कैदी आणि तुरूंगरक्षक कोरोनाबाधित असल्याचे अहवाल येत होते तुरुंगांशी संबंधित असे एक हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण समोर आले होते. गेल्या आठवड्यात एक कैदी मारला गेला तर गेल्या मार्चमध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला. आम्ही खात्रीने सांगू शकत नाहीत पण बरेचसे मृत्यू व कैदी जखमी झालेत ते बंदुकीच्या गोळ्यांमुळे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजिथ रोहाना यांनी म्हटले.