श्रीराम मंदिराचे गर्भगृह तयार! अयोध्या सजू लागली, मंदिरात स्थापित होणाऱ्या मूर्तींची याच महिन्यात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:46 AM2023-12-10T10:46:53+5:302023-12-10T10:47:26+5:30
अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर गर्भगृहाची छायाचित्रे शेअर केली आहेत.
राजेंद्र कुमार
लखनौ : अयोध्येतील भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोशल मीडियावर गर्भगृहाची छायाचित्रे शेअर केली आहेत.
चंपत राय यांनी म्हटले आहे की, श्री रामलल्लाचे गर्भगृह जवळपास तयार झाले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या परिसरात लाइटिंग-फिटिंगचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. एकीकडे ही तयारी पूर्ण होत आलेली असताना दुसरीकडे योगी सरकारही श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी रामनगरी अयोध्या भव्य-दिव्य रूपात सजवण्यास सज्ज झाले आहे. याअंतर्गत श्रीराम जन्मभूमी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर रामायणकालीन प्रमुख प्रसंगांचे मनमोहक चित्रण करण्यात येत आहे.
रामलल्लाची मूर्ती बालकाच्या रूपात
रामलल्लाची मूर्ती बालकाच्या रूपात असेल, त्यामुळे बालसुलभ कोमलता कोणत्या मूर्तीत असेल, अशा बाबी लक्षात घेत स्थापित केल्या जाणाऱ्या मूर्तीची निवड केली जाईल. यासाठी काशीच्या शंकराचार्यांसह दक्षिणेतील संतांची सहमती घेतली जाणार आहे.
कुठे आकाराला येत आहेत मूर्ती?
मंदिरात स्थापित होणाऱ्या अचल मूर्तीचे निर्माणकार्य रामसेवक पुरम येथील कार्यशाळेत केले जात आहे.
कर्नाटकमधून आलेल्या श्याम शिळेतून दोन मूर्ती, तर राजस्थानमधून आलेल्या संगमरवर दगडातून एक मूर्ती तयार केली जात आहे. तिन्ही मूर्ती तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आयआयटी हैदराबाद तिन्ही मूर्तीच्या दगडांच्या गुणवत्तेचा अहवाल देणार असून, त्यावरून मूर्तीची निवड केली जाणार आहे.
तिन्ही मूर्तींंपैकी कोणत्या मूर्तीचे आयुष्य सर्वाधिक आहे व दगडाची चमक किती वर्षे कायम राहणार आहे, हे आयआयटी हैदराबादच्या अहवालात नमूद केले जाणार आहे.
मूर्तींची निवड कशी होणार
मंदिरात प्रतिष्ठापित होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची निवडही याच महिन्यात करण्यात येणार आहे. भगवान रामलल्लाच्या तीन मूर्ती तयार करण्यात येत आहेत.
काशीचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती, काशीचे प्रसिद्ध विद्वान गणेश्वर द्रविड व दक्षिण भारतातील काही प्रमुख संतांच्या सहमतीनंतर प्राणप्रतिष्ठेसाठी तीन मूर्तींपैकी एका मूर्तीची निवड करण्यात येणार आहे.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी दोन मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. एक अचल मूर्ती व दुसरी चल मूर्तीच्या रूपात स्थापित होईल. सध्या पूजेतील-प्रतिष्ठित रामलल्लाच्या मूर्तीला उत्सव म्हणजेच चल मूर्तीच्या रूपात प्रतिष्ठित केले जाईल. तर नवीन मूर्ती अचल मूर्तीच्या रूपात स्थापित केली जाईल. मूर्तीवर प्रकाश पडल्यावर तिन्हीपैकी कोणती मूर्ती सर्वांत जास्त भव्य व आकर्षक दिसेल, हे पाहिले जाणार आहे.