८०० रेल्वे प्रवाशांचे वाचवले होते प्राण… आता केंद्र सरकारकडून होणार गौरव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:17 IST2024-12-18T16:17:25+5:302024-12-18T16:17:52+5:30
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते.

८०० रेल्वे प्रवाशांचे वाचवले होते प्राण… आता केंद्र सरकारकडून होणार गौरव!
नवी दिल्ली : भारतात रेल्वे हे सर्वात मोठे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी थोडीशी चूकही अनपेक्षित अपघात आणि जीवितहानी होऊ शकते. अशा परिस्थितीत रेल्वे कर्मचारी खूप सतर्क असतात. त्यानुसार त्यांचे कार्य असते. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते.
यंदाही या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात केंद्र सरकारने तामिळनाडूमधील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर जफर अली यांना पुरस्कार जाहीर केला आहे. जफर अली यांनी गेल्या वर्षी आलेल्या पुरातून जवळपास ८०० लोकांचे प्राण वाचवले होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी हे २१ डिसेंबर रोजी साजरा होणारा अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार-२०२४ प्रदान करतील. दरम्यान, गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२३ रोजी मिक जॅम चक्रीवादळामुळे अचानक पूर आला होता. तिरुनेलवेली, तुतीकोरिन आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता.
अशा स्थितीत सेंचर एक्सप्रेस ट्रेन नेहमीप्रमाणे तिरुचेंदूरहून चेन्नईसाठी रवाना झाली. ही ट्रेन श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यानंतर स्टेशन मास्टर जफर अली यांना अभियांत्रिकी अधिकाऱ्याकडून रेल्वे लाईन पुराच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्टेशन मास्टर जफर अली यांनी तातडीने श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली होती. मुसळधार पाऊस आणि सर्वत्र अंधारामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बराच वेळ ट्रेन एकाच ठिकाणी थांबल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्टर जफर अली यांच्याशी वादही घातला.
अशा परिस्थितीत दुसरा दिवस उजाडला, तेव्हा रेल्वे स्थानकात सर्वत्र पाणी तुंबलेले पाहून सर्व प्रवासी आश्चर्यचकित झाले. जवळपास २ दिवस ट्रेन एका जागी उभी होती. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्यांना अन्न व पाणी पुरवले. पूरसदृश परिस्थितीमुळे बचाव पथक सुमारे तीन दिवसांनी श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर पोहोचले. वेळेवर ट्रेन थांबवल्याने ८०० प्रवाशांचे प्राण वाचले. यानंतर स्टेशन मास्तर जफर अली यांचे विविध पक्षांकडून कौतुक करण्यात आले.