श्रीदेवींच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 03:02 PM2018-05-25T15:02:27+5:302018-05-25T15:07:29+5:30
बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसहीत चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या सदम्यातून अद्यापही त्यांचे कुटुंबीय-चाहते सावरलेले नाहीत.
मुंबई - बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसहीत चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या सदम्यातून अद्यापही त्यांचे कुटुंबीय-चाहते सावरलेले नाहीत. अशातच त्यांच्या निधनाबाबत रोज नव-नवीन खुलासे होत आहेत. श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र आता नवी दिल्लीतील एका माजी एसीपींनी श्रीदेवींच्या मृत्यूबाबत नवा दावा केला आहे. मात्र त्यांनी सांगितलेल्या श्रीदेवींच्या मृत्यूमागील कारणावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
माजी एसीपींच्या दाव्यानुसार, श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या हॉटेलमध्ये श्रीदेवींचा मृत्यू झाला होता, ते हॉटेल दाऊद इब्राहिमचं आहे. शिवाय, श्रीदेवींच्या मृत्यूच्या दिवशी दाऊद इब्राहिमदेखील हॉटेलमध्ये उपस्थित असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर, सत्य समोर यावे, यासाठी लवकरच वेद भूषण सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. शिवाय, त्यांनी दुबई पोलिसांकडे यासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती देण्याचीही मागणी केली, मात्र पोस्टमार्टेम प्रत शिवाय पोलिसांनी अन्य कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.
ओमानमध्ये श्रीदेवी यांच्या नावावर जवळपास 240 कोटी रुपयांचा लाइफ इन्शुरन्स काढण्यात आल्याचेही भूषण यांचं म्हणणं आहे. अशात दुबईत मृत्यू झाल्यासच इन्शुरन्सची रक्कम मिळण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर श्रीदेवी यांच्या मृत्यूसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही, वेद भूषण यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केल होती, मात्र 11 मे रोजी सुनावणीदरम्यान कोर्टानं याचिका रद्द केली होती.