बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू, मृतदेह येण्यास विलंब; आज अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 03:45 AM2018-02-27T03:45:14+5:302018-02-27T03:45:14+5:30
ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडून नव्हे, तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. दिवसभर वृत्तवाहिन्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी तिच्या कुटुंबाने श्रीदेवीच्या मृत्यूमध्ये आम्हाला संशय घेण्यासारखे काही वाटत नाही, असे स्पष्ट केले.
दुबई/मुंबई : ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडून नव्हे, तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. दिवसभर वृत्तवाहिन्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी तिच्या कुटुंबाने श्रीदेवीच्या मृत्यूमध्ये आम्हाला संशय घेण्यासारखे काही वाटत नाही, असे स्पष्ट केले.
श्रीदेवीचे पार्थिव सोमवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे. पार्थिव आल्यानंतर काही वेळ ते रिक्रिएशन हॉलमध्ये ठेवण्यात येईल
आणि नंतर विलेपार्ले येथील पवनहंसजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. सिनेसृष्टीतील असंख्य
तारे-तारकांनी सांत्वन करण्यासाठी अनिल कपूरच्या निवासस्थानी रीघ लावली, तर चाहते श्रीदेवीच्या लोखंडवालामधील घराच्या बाहेर प्रतीक्षा करीत होते.
दुबई पोलिसांचे काय म्हणणे?
श्रीदेवी आधी बेशुद्ध झाली व नंतर बाथटबमध्ये बुडाली, असे दुबई पोलिसांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
शवविच्छेदनानंतर श्रीदेवीचा मृतदेह सुस्थितीत राहावा, यासाठी त्याच्यावर रासायनिक मुलामा दिला गेला. त्यानंतर, पुढील कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रॉसिक्युटर कार्यालयाकडे सुपुर्द केला गेला. पार्थिव आणण्यासाठी रविवारीच खासगी विमान गेले होते.
दुबईत भाच्याच्या लग्नाला गेलेल्या श्रीदेवीचा गेल्या आठवड्यापासून जुमेरा एमिरेट््स टॉवर हॉटेलच्या २२व्या मजल्यावरील स्युटमध्ये मुक्काम होता. लग्नानंतर श्रीदेवीचे
पती बोनी कपूर मुंबईला परतले. मात्र, शनिवारी सायंकाळी ते परत
दुबईला गेले.
दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे गप्पा झाल्या व त्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीला अचानक बाहेर जेवायला जाण्याचे सुचविले. तयारी करण्यासाठी श्रीदेवी बाथरूममध्ये गेल्या. बराच वेळ झाला, तरी त्या बाहेर न आल्याने बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला, तेव्हा श्रीदेवी बाथटबमध्ये निश्चल पडलेल्या दिसल्या.
बोनी कपूर यांनी आधी एका मित्राला व नंतर पोलिसांना कळविले. श्रीदेवी यांना इस्पितळात हलविण्यात आले, पण तत्पूर्वीच त्यांचे प्राणोत्क्रण झाले होते.
तर्क वितर्क
बुडण्याआधी कशामुळे बेशुद्ध झाल्या, याचे नक्की कारण समजू शकले नाही. कदाचित, हृदयक्रिया अचानक बंद पडून त्या बेशुद्ध झाल्या असाव्यात व तोल जाऊन बाथटबमध्ये पडल्या असाव्यात, असा तर्क आहे. बाथटब पाण्याने पूर्ण भरला होता, यावरून त्या स्नानासाठी गेल्या होत्या व बाथटबमध्ये पाणी भरेपर्यंत ठाकठीक होत्या, असे दिसते.