म्हणून केले जात आहे श्रीदेवींच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 01:55 PM2018-02-25T13:55:40+5:302018-02-25T15:02:16+5:30
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने भारतीय सिनेजगतामध्ये शोककळा पसरली आहे.मुंबईतील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे...
नवी दिल्ली - प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने भारतीय सिनेजगतामध्ये शोककळा पसरली आहे. हवाहवाई गर्लने जीवनाच्या रंगमंचावरून एकाएकी एक्झिट घेतल्याने तिचे चाहते हळहळत आहेत. मुंबईतील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यात येत आहे. त्यानंतर दुबई पोलिसांकडून फॉरेंसिक तपासाचा अहवाल तयार करण्यात येणार असून, त्यानंतरच श्रीदेवी यांचे पार्थिव रविवारी संध्याकाळनंतर मुंबईत पाठवण्यात येईल.
भारतात प्रकृती अस्वस्थ्यामुळे मृत्यू झाल्यास सर्वसामान्यपणे पोस्टमॉर्टेम केले जात नाही. पण दुबईमध्ये वेगळे कायदेकानून आहेत. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक असला तरी तिथे मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते.
या कारणांमुळे होत आहे श्रीदेवींच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम
- श्रीदेवींचा मृत्यू हृदयगती थांबल्याने झाला. पण दुबईमधील कायद्याप्रमाणे कुठल्याही परदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचा तपास केला जातो. त्यासाठी पोस्टमॉर्टेम केले जाते. जेणेकरून मृत्यूच्या खऱ्या कारणाचा शोध घेता येऊ शकेल.
- तसेच पोलिसांना कागदोपत्री सोपस्कारही पूर्ण करावे लागतात. त्याअंतर्गत संबंधित देशाच्या दुतावासाला माहिती दिली जाते.. त्यानंतर दुतावासाकडून मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जारी केले जाते.
- पोस्टमॉर्टेमनंतर येणाऱ्या अहवालात मृत्यूचे कारण नमूद केले जाते. तसेच या कागदपत्रांवर पोलिसांची मोहोर लावलेली असते.
- सध्या दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या पार्थिवाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून, सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्या नंतर त्यांचा मृतदेह मुंबईत आणता येईल.