शाळेत शिकविणार श्रीमद् भगवद्गीता; पाठ्यपुस्तकात श्लोकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 06:22 AM2022-12-25T06:22:31+5:302022-12-25T06:23:07+5:30
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात आता श्रीमद् भगवद्गीतेचा समावेश करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात आता श्रीमद् भगवद्गीतेचा समावेश करण्यात आला आहे. सहावी आणि सातवीच्या पाठ्यपुस्तकात श्रीमद भगवद्गीतेचा संदर्भ आणि इयत्ता अकरावी व बारावीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकात त्यातील श्लोकांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिखित स्वरूपात लोकसभेत उत्तर देताना ही माहिती दिली.
भारतीय ज्ञानाच्या सर्व पैलूंवर संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने २०२०मध्ये ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनमध्ये इंडियन नॉलेज सिस्टिम विभागाची स्थापना केली. संशोधनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे.
आपला वारसा समजून घ्यायला हवा
अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की, एनसीईआरटीने राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या उपक्रमांसंदर्भात मंत्रालय, विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून सूचना मागविण्यात आल्या. या शतकात ज्ञानशक्ती बनण्यासाठी आपण आपला वारसा समजून घेतला पाहिजे. तसेच, जगाला भारतीय पद्धती शिकवायला हव्यात.
शिक्षणाच्या भगवेकरणाचा आरोप
पाठ्यपुस्तकात श्रीमद भगवद्गीता शिकविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की, भाजप शिक्षण व्यवस्थेचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देशातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती समजून घ्यावी. याबाबत शिक्षण घ्यायला हवे, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"