श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद

By admin | Published: May 31, 2017 01:10 AM2017-05-31T01:10:45+5:302017-05-31T01:10:45+5:30

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्याने काश्मीर खोरे हिंसक निदर्शनांनी

Srinagar-Jammu national highway closed | श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद

श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद

Next

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्याने काश्मीर खोरे हिंसक निदर्शनांनी धुमसत आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काश्मीरमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम होते. दरम्यान, फुटीरवाद्यांनी सबजार भटला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्रालपर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपिया या जिल्ह्यांत मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते, तसेच श्रीनगरमधील खानयार, नौहट्टा, सफाकदल, एम. आर. गुंज, रैनावारी, क्रालखुद आणि मैसुमा या सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणि सोपोरमध्ये अशाच प्रकारे निर्बंध कायम ठेवण्यात आले होते.
फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसांत या भागातील बव्हंशी दुकाने, पेट्रोल पंप आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. सार्वजनिक वाहतूकही ठप्प होती; परंतु खाजगी कार, टॅक्सी आणि आॅटोरिक्षा धावताना दिसल्या.
सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे नेते सय्यद अली शाह गिलानी, मीरवाईज उमर फारुक आणि जेकेएलएफ प्रमुख यासिन मलिक यांनी त्रालपर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात लोकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचेआवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हा महामार्ग दक्षिण काश्मीरमधून जात असल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली नाही, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. कारगिल-सोनमर्गमार्गे श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

नियंत्रण रेषेपार वाहतूक ठप्प


भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्याने काश्मीरमधील नियंत्रण रेषेपार प्रवासी आणि व्यापारी वाहतूक सोमवारपासून ठप्प आहे.
पाकव्याप्त काश्मीरकडे लोकांना प्रवास करता आला नाही, तसेच आवश्यक वस्तू घेऊन मालट्रकही जाऊ शकले नाहीत. दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नियंत्रण रेषेपार प्रवासी आणि व्यापारी वाहतूक ठप्प आहे.

Web Title: Srinagar-Jammu national highway closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.