श्रीनगरमध्ये तासाभरामध्ये दोन दहशतवादी हल्ले, तीन पोलिस ठार
By admin | Published: May 23, 2016 11:53 AM2016-05-23T11:53:24+5:302016-05-23T13:26:03+5:30
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी तासाभरामध्ये दोन दहशतवादी हल्ले केले. या हल्ल्यात तीन पोलिस ठार झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २३ - जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी तासाभरामध्ये दोन दहशतवादी हल्ले केले. या हल्ल्यात तीन पोलिस ठार झाले यात एका अधिका-याचा समावेश आहे. श्रीनगरमधील झाडीबाल येथे सकाळी पावणेअकराच्या सुमारास दहशतवाद्यांनी पहिला हल्ला केला.
या गोळीबारात दोन पोलिस ठार झाले. मध्य श्रीनगरमधील दाट लोकवस्तीच्या भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांवर अत्यंत जवळून गोळीबार केला. दोन्ही पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाम मोहोम्मद आणि कॉन्स्टेबल नाझीर अहमद या हल्ल्यात ठार झाले.
दोघेही झादीबाल पोलिस स्थानकात तैनात होते. गोळीबार करुन दहशतवादी लगेच घटनास्थळावरुन पसार झाले. दुस-या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल मोहम्मद सादीक ठार झाला. दहशतवाद्यांनी त्याच्याजवळची सर्व्हीस रायफलही पळवली. दुपारी बाराच्या सुमारास हा हल्ला झाला.
तीन वर्षानंतर श्रीनगरमध्ये लागोपाठ दोन मोठे हल्ले झाले आहेत. २२ जून २०१३ मध्ये अशा प्रकारचा शेवटचा हल्ला झाला होता. हरी सिंग मार्गावर केलेल्या गोळीबारात दोन पोलिस ठार झाले होते.