SSC HSC Exam 2021: दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लस द्या; शिवसेनेची लोकसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:15 PM2021-03-25T12:15:37+5:302021-03-25T12:17:54+5:30
SSC HSC Exam 2021: दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावी, अशी मागणी शिवसेनेकडून लोकसभेत करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पाही देशभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam 2021) परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा शिवसेनेच्या वतीने लोकसभेत मांडण्यात आला असून, एप्रिल महिन्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावी, अशी मागणी शिवसेनेकडून लोकसभेत करण्यात आली आहे. (shiv sena mp demands in lok sabha that 10th and 12th student should get corona vaccine)
यावर्षी राज्यातून दहावीसाठी १३ लाख तर १२ वीसाठी १६ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. याशिवाय आयसीएसइ आणि आयएससी परिक्षेसाठीही अनुक्रमे १२ हजार आणि २३ हजार विद्यार्थी बसणार आहेत. तसेच सीबीएससीच्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ; वर्षा गायकवाड यांची घोषणा
सर्व राज्यांनाही निर्देश देण्याची विनंती
लोकसभेच्या शून्य प्रहरात विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी बोलताना केली. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पालकांची चिंता वाढली आहे. या परिस्थितीत परीक्षेला देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली, तर विद्यार्थी आणि पालक निर्धास्त होतील. तसेच परीक्षेवेळी उपस्थित राहणारे शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांचेही कोरोना लस देण्याची गरज असून, तातडीने ही प्रक्रिया सुरू करावी. जेणेकरून परीक्षा सुरू व्हायच्या आधी ती पूर्ण होतील, असेही शेवाळे यांनी म्हटले आहे.
कोरोना संसर्गाचा वेग वाढला
कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल ५३,४७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून, एकूण कोरोना रुग्णसंख्या ०१,१७,८७,५३४ वर पोहोचली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी अलीकडेच स्पष्ट केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.